नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या स्पष्ट विचारांसाठी प्रसिद्ध आहेत मोदी सरकारमध्ये मागील अकरा वर्षांपासून ते मंत्री असतानाही सरकारच्या अनेक धोरणावर त्यांनी स्पष्ट मत मांडलेले आहे नागपूर मध्ये काल झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले. गडकरी म्हणाले, मी सरकारमध्ये असलो तरी सरकारसोबत जोडून कुठलेही काम करू नका. गडकरी नेमकी असं का म्हणाले ते पाहूया.
कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या एकलव्य एकल विद्यालय शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचा रविवारी समारोप झाला. त्यावेळी मार्गदर्शन करताना गडकरी बोलत होते. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचे अध्यक्ष अतुल शिरोडकर, उपाध्यक्ष राजीव हडप आदींनी आदिवासी विद्यापीठ स्थापन करणे संबंधात गडकरींकडे मागणी केली आहे. यावर गडकरी म्हणाले की, आमच्या संस्थेतील लोक खूप छान काम करतात. नवीन उपक्रमा संदर्भात ते फार आशावादी आहेत. मात्र मी सरकारमध्ये काम करत असलो तरी सरकार सोबत जोडून आपण हे काम करायला नको अशी स्पष्ट भूमिका गडकरींनी घेतली.
पुढे ते म्हणाले की, अतिदुर्गम आदिवासी भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वसतीगृह तयार करण्याची योजना असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. याठिकाणी नाममात्र दरामध्ये राहण्याची, जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. आदिवासी विद्यार्थ्यांमधून भविष्यातील डॉक्टर, अभियंते आणि अन्य क्षेत्रातले दिग्गज तयार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गडचिरोली जिल्ह्यात ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल सुद्धा आपण मंजूर करणार आहोत. जेणेकरून, तिथे रोजगार निर्मिती होऊ शकेल, अशी माहिती देखील त्यांनी दिली.
कैलास सत्यार्थींनी केले गडकरींच्या कामाचे कौतुक
या कार्यक्रमाला नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी उपस्थित होते. भारताला विश्वगुरू बनायचे असेल तर केवळ ‘सोन्याची चिडीया’ बनून हे शक्य नाही. तर त्याला गुरूत्व दाखवावे लागेल. जे लोक अंधारामध्ये आहेत त्यांना प्रकाशात नेण्याचे काम करावे लागेल. तेव्हाच भारताला विश्वगुरू बनवण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास नाेबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केला. आपल्या सारख्या निस्वार्थ आणि ध्येयवेड्या लोकांच्या माध्यमाने दुर्गम आदीवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी जे कार्य सुरु आहे, त्यात आपण एका प्रकाशमय दिव्याचे कार्य करत आहात. या दिव्याने स्वतः जळत राहून अनेक आयुष्य उजळण्याचा ध्यास घेतला आहे आणि या सातत्यपूर्ण कार्याने आपणच भारताला जगतगुरू बनवणार असल्याचा विश्वास सत्यार्थी यांनी व्यक्त केला. मी आपणा सर्वांकडून अनेक वर्षांची प्रेरणा घेत असल्याचे गौरव उद्गार सत्यार्थी यांनी सुरवातीला काढले.