नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपचे असले तरीही सर्वच पक्षातील नेते, कार्यकर्ते यांच्यासाठी ते आदरणीय व्यक्तिमत्त्व आहेत. सर्वच पक्षातील नेते, कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ जुळते आणि म्हणूनच विरोधी पक्षातील नेता, कार्यकर्ता त्यांच्याकडे गेला, तरीही त्यांचे काम ते प्राधान्याने करतात. आपल्या धाडसी वक्तव्यासाठी आणि निर्णयासाठी देखील ते ओळखले जातात. नुकतेच त्यांनी घेतलेला येऊ निर्णय सर्वांसाठीच प्रशंसनीय ठरला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका उड्डाणपुलाला काँग्रेसच्या नेत्याचे नाव दिले आहे. ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांचे नाव या उड्डाणपुलाला देण्यात आले आहे. आज या पुलाचा लोकार्पण सोहळा आयोजित केला असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र त्यांचा करंटेपणा दाखवला आहे.

बोले पेट्रोल पंप चौकापासून सुरू होणारा हा उड्डाणपूल आरटीओ कार्यालयापुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महात्मा फुले परिसर, फुटाळा चौकापर्यंत २.८५ किमी लांबीचा आहे. शहरातील सर्वांत वर्दळीचा हा उड्डाणपूल असून, उड्डाणपुलाला ‘ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपूल’ असे नाव देण्यात आले आहे, तर वाडी पोलिस ठाणे ते गुरुद्वारा हा पहिला उड्डाणपूल १.९५ किमी लांबीचा आहे.

पुलावरील वाहनांसाठी वेगमर्यादा ८० किमी प्रतितास निश्चित केली आहे. या उडाण पुलाला ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांचे नाव दिले असताना लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर ज्ञानयोगी डॉ श्रीकांत जिचकार यांचे नाव कुठेही दिसत नाही हे आश्चर्यकारक व निंदनीय आहे. सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी उडाण पुलावर ज्ञानयोगी डॉ श्रीकांत जिचकार यांचे नाव लिहिले आहे पण पत्रिकेत नाव नाही यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी किती कार्यक्षम आहे हे दिसुन येते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरात रस्ते, भुयारी मार्ग, उड्डाणपूल बांधण्याचा धडाका लावला आहे. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यत रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, बोगदे उभारण्यात येत आहेत. नागपुरातही मोठ्या संख्येने उड्डाणपूल, भुयारी मार्गाचे काम सुरू आहेत.

नागपुरातील अमरावती मार्गावरील आरटीओ चौक ते फुटाळा चौकापर्यंतच्या उड्डाणपुलाचे उद्घाटन आज होणार आहे. फुटाळा चौकाच्या दिशेने सर्व्हिस रोडचे काम केल्या जात आहे. या प्रकल्पासाठी विविध परवानगी मिळण्यात विलंब झाल्याने उड्डाणपुलाच्या पूर्णत्वासाठी वर्षभर प्रतीक्षा करावी लागली.

पुलावर एकूण ७६६ सेग्मेंट्स बसविण्यात आले असून, लॉ कॉलेज चौकात मलेशियन तंत्रज्ञानाचा वापर करून ६५ मीटर लांबीचे, २५० टन वजनाचे ६ गर्डर्स उभारण्यात आले आहेत. महाराजबाग क्लबपासून सर्व्हिस रोडवरही वाहतूक सुरू केली जाणार आहे. बांधकाम सार्वजनिक विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत ४७८ कोटी रुपये खर्चुन अमरावती रस्ते वाहतूक सुधारणा प्रकल्पांतर्गत उड्डाणपूल बाधण्यात आला आहे. उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर अमरावती रोडवरून ५ किमी अंतर फक्त ५ मिनिटांत पार करता येणार आहे. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीपासून सुटका होणार आहे