नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडील विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जम्मू-काश्मीर, लेह-लडाख यासह अतिशय दुर्मिळ भागात रस्ते बांधणी, पूल उभारण्याचे करत आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये सोनमर्ग बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. एनएचएआयने अनेक रस्ते विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील उड्डाणपूल ६ महिन्यात खचला आहे.
नितीन गडकरी यांच्या जिल्ह्यातील नागपूर- हैदराबाद दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील बुटीबोरी उड्डाण पूल साडेतीन वर्षांत खचला होता. मानाकापूर उड्डाण पूल देखील दोनदा खचला. त्यामुळे एनएचएआयच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.
एनएचएआयने ६.४ किमी लांबीचा मुख्य सोनमर्ग बोगदा बांधला आहे. तो अलीकडे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तसेच झोजिला बोगदा २०२८ साला पर्यंत पूर्ण होणार असून सोनमर्ग प्रकल्पामुळे या मार्गाचे अंतर ४९ किमी वरून ४३ किमी इतके कमी होईल. यामुळे श्रीनगर खोरे ते लडाख पर्यंत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. १ वरील प्रवास अधिक सुरळीत होणार आहे. एकीकडे समुद्रसपाटीपासून ८ हजार फुटांहून अधिक उंचीवर बोगदा बांधण्यात येत आहेत. मात्र, सहा महिन्यांत गोंदिया जिल्हा अंतर्गत देवरी तालुक्यातील मरामजौब मासूलकसा घाट परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वरील उड्डाण पुलाला पहिल्याच पावसात भेगा पडल्याने अग्रवाल ग्लोबल कंपनीचे पितळ उघडे पडल्याने कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
अवघ्या सहा महिन्यापूर्वी सदर पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आणि पहिल्याच पावसात महामार्गाला तडे गेले, यामुळे वाहनधारकांच्या जीवितास चोका निर्माण झाला आहे. एकंदरीत या महामार्गाच्या कामाचे अवघ्या काही महिन्यातच पितळ उघड पडले आहे.’
राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील गोंदिया जिल्हा अंतर्गत देवरी शहरातील मरामजोब मासूलकसा घाट परिसरात वन्य जीव संरक्षणाकरिता उड्डाण पुलाचे बांधकाम करण्यात आले. सदर बांधकामाचे कंत्राट शासनाने अग्रवाल ग्लोबल कंपनीला दिले होते. अग्रवाल ग्लोबल कंपनीने जवळपास अंदाजे पाच वर्षांमध्ये या उड्डाणपूलाचे बांधकाम पूर्ण केले. उड्डाण पुलावरून रहदारी सुरळीतपणे सुरू करण्यात आली. जडवाहतूक हलके वाहतूक रात्रंदिवस धावू लागले.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देवरी तालुक्यामध्ये कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. परंतु या पावसामुळे मरामजोब मासूलकसा घाट परिसरात तील उड्डाण पूल पूर्णतः एका बाजूने खाली बसल्याने, उड्डाण पुलाच्या एका बाजूने रोडला मोठमोठ्या भेगा पडल्या. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सदर उड्डाण पूल निकृष्ट साहित्याने बनविण्यात आल्याचे पहिल्याच पावसाने अग्रवाल ग्लोबल कंपनीचे पितळ उघडे पाडले आहे. सदर कंपनीवर शासनाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे.