नागपूर : अवघ्या १९ व्या वर्षांच्या दिव्या देशमुखने बुद्धिबळाच्या जागतिक स्पर्धेत महिला विश्वचषकाचा खिताब मिळवला. दिव्या वयाच्या पाचव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळत असून मागील १४ वर्षांपासून सातत्याने विजयाला गवसणी घालत आहे. तीन दिवस चाललेल्या अंतिम फेरीत दिव्याने संयम तसेच आक्रमकता यांचा उत्तम समतोल साधत अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला ६४ चौरसाच्या खेळात पराभूत केले. यानंतर देशभरातून दिव्याचे कौतुक सुरू झाले. केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी नागपूरची कन्या दिव्याला थेट व्हिडिओ कॉल केला.
काय म्हणाले गडकरी?
नागपूरची रहिवासी असलेली दिव्याने २०१० मध्ये केवळ पाचव्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. तिचे पालक डॉ. जितेंद्र आणि नम्रता यांनी तिला जवळच्या बुद्धिबळ अकादमीत घातले. नागपूरच्या शंकरनगर येथील त्यांच्या वसाहतीत बॅडमिंटन, बास्केटबॉल आणि बुद्धिबळ असे तीन खेळ शिकवले जात होते. दिव्याची मोठी बहीण आर्या बास्केटबॉल आणि बॅडमिंटन खेळत होती. दिव्याला हळूहळू या बुद्धिबळाची आवड निर्माण झाली आणि दोन वर्षांतच, जुलै २०१२ मध्ये पुदुचेरी येथे झालेल्या स्पर्धेत तिने सात वर्षांखालील पहिले राष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले.
त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. २०१३ मध्ये इराणमध्ये झालेल्या आठ वर्षांखालील आशियाई स्पर्धेत तिने विजेतेपद मिळवत आंतरराष्ट्रीय छाप सोडली. त्यानंतर ती पुढील वर्षी वर्ल्ड युथ चॅम्पियनशिपसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पात्र ठरली. २०१४ मध्ये, वयाच्या अवघ्या आठ वर्षे आणि पाच महिन्यांत, तिने दक्षिण आफ्रिकेतील डरबन येथे १० वर्षांखालील वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. तेव्हापासून तिने भारताचे ४० वेळा प्रतिनिधित्व केले असून, त्यात तिने ३५ वेळा पदक मिळवले आहे. यात २३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. सोमवारी मिळवलेल्या विजयानंतर स्वत: गडकरी यांनी दिव्याला फोन केला.
दिव्या देशमुखच्या विजयानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तिला थेट ‘व्हिडिओ कॉल’ करत शुभेच्छा दिल्या. दिव्या तुला खूप खूप शुभेच्छा. तुझा खूप अभिमान आहे सगळ्यांना. देव तुला सदैव आशीर्वाद देवो, अशा शब्दात गडकरींनी दिव्याचे कौतुक केले. दिव्यानेही स्मितहास्य देत गडकरींच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. यानंतर गडकरींनी आता तुला कस वाटत आहे, अशी विचारणा केली. यावर दिव्याने खूप छान वाटत आहे, अशा शब्दात दिव्याने गडकरींना उत्तर दिले.