नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे बिनधास्त बोलण्यासाठी परिचित आहेत. शनिवारी नागपूरातील खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीद्वारा आयोजित शिववैभव किल्ले स्पर्धा कार्यक्रमात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगितला. याप्रसंगी त्यांनी एक किस्सा सांगत, कोणताही महत्वाचा निर्णय घ्यायचा असल्यास कोणत्या छायाचित्राकडे बघून प्रेरणा मिळते, याबाबत भाष्य केले.
नितीन गडकरी पुढे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. प्रत्येकाच्या सर्वाधिक जवळ आई-वडील असतात. परंतु लहानपणापासून आमच्या आई-वडिलांहूनही जास्त स्थान आमच्या हृदयात ज्यांच्याबाबत होते त्या व्यक्तीचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. छत्रपती शिवाजी महाराज आदर्श शासक होते, न्यायप्रिय होते, कल्याणकारी राजे होते. रामदास स्वामींनी त्यांचं यथार्थ वर्णन केलं आहे. त्यानुसार ‘यशवंत, कीर्तीवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी’.
प्रत्येक गोष्टीत आदर्श कुणी असेल तर ते शिवाजी महाराज. एक राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं ते उत्तमच होते. आजच्या काळात शिवाजी महाराजांची शिकवण आवश्यक आहे. शिवाजी महाराजांनी ‘रयतेचं राज्य’ ही संकल्पना आणली होती. त्यांनी शौर्य आणि पराक्रम यांचा इतिहास रचला, हे वास्तव असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.”
याप्रसंगी मंचावर प्रामुख्याने धर्मभास्कर सद्रुरुदास महाराज उपाख्य विजयराव देशमुख, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुधोजी भोसले, प्रा. अनिल सोले, जयप्रकाश गुप्ता, रमेश सातपुते, दयाशंकर तिवारी, सुधाकर कोहळे आणि संजय बंगाले उपस्थित होते.
कार्यालयात हे छायाचित्र दर्शनी भागात लावले…
नितीन गडकरी म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांकडे अचूक निर्णय घेण्याची प्रचंड क्षमता होती. त्यामुळे माझ्या कार्यालयातील दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र लावले आहे. हे छायाचित्र मला महत्वाचा निर्णय घेताना प्रेरणा देत असते. नागपुरातील आजची किल्ले स्पर्धा केवळ मनोरंजनासाठी नाही, तर या किल्ल्यांचा इतिहास लहान मुलांपासून सर्व वयोगटातील व्यक्तींना कळावा आणि आपल्या संस्कृतीबाबत सगळ्यांना माहिती मिळावी, हा उद्देश आहे. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज घरोघरी पोहोचून तयार होण्यास मदत होणार आहे,” असेही गडकरी यांनी सांगितले.
किल्ले म्हणजे दगड-मातीच्या प्रतिकृती नव्हे तर…
“किल्ले म्हणजे केवळ दगड-मातीच्या प्रतिकृती नव्हे, तर भूतकाळातील आपली संस्कृती, विरासत, प्रेरणा, अध्यात्माचे चिंतन करून भविष्यात राष्ट्रनिर्माणासाठी महत्वाचे आहेत,” असेही गडकरी यांनी सांगितले.
