नागपूर: उपराजधानीतील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर खासदार सांस्कृतिक महोत्सव सुरू आहे. शनिवारी या मैदानावर एका कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हजारो नागपूरकरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांकडे एक महत्त्वाची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची स्तुती केली.

नागपुरातील खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीकडून शनिवारी (८ नोव्हेंबर २०२५ रोजी) सुप्रसिद्ध गायक विशाल मिश्रा यांचे लाईव्ह इन काॅन्सर्ट आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. त्यापूर्वी दुपारी समितीकडून येथे गीता पठणाचा मोठा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्ह्यातील ३०२ शाळांमधील ५ वी ते बारावीपर्यंतच्या ५२,५५९ विद्यार्थ्यांनी एकत्र येत भगवद्गीतेचा बाराव्या, पंधराव्या आणि सोळाव्या अध्यायचे एकाच सुरात पठण केले. हा सामूहिक पठण सोहळा वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स या तीन संस्थांनी नोंद केला आहे. ही माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिली गेली.

नितीन गडकरी यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून शहरात सांस्कृतिक विकास करण्याचा समितीचा प्रयत्न असल्याचे सांगितले. त्यातून स्थानिक कलावंतांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत मागील दहा वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबवला जात असल्याचीही माहिती त्यांनी दिली. दरम्यान आजच्या विशाल मिश्रा यांच्या कार्यक्रमाची पास अनेकांना देता आली नसल्याबाबत त्यांनी जनतेची जाहिर माफी मागितली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूर शहरात १ लाख नागरिकांना बसता येईल असे मोठे स्टेडियम बांधण्याची मागणी केली. मोठी मैदान झाल्यास कुणीही नागपूरकर मोठ्या कार्यक्रमाला मुकणार नसल्याचेही गडकरी म्हणाले.

‘हा महोत्सव नितीन गडकरींच्या नेतृत्वात आपल्याला मिळालेला उपकारच’

खासदार सांस्कृतिक महोत्सव हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात आपल्याला मिळालेला उपकारच आहे. महोत्सवामुळे एकीकडे नागपूरसह विदर्भातील स्थानिक कलावंतांना कला सादर करण्यासाठी मोठा मंच मिळाला असून दुसरीकडे जग आणि देशभरातील मोठ्या कलावंतांना नागपुरात प्रत्यक्ष पाहणे-एकण्याची संधी नागपूरकरांना मिळाली आहे. त्यामुळे नागपुरकरांच्या वतीने मी नितीन गडकरी आणि खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अभिनंदन करतो. दिवसा समितीकडून भक्ती महोत्सव घेतले जाते. त्यात शनिवारी एकाचवेळी सुमारे ५३ हजार मुलांनी गीता पठण करून नवीन विक्रम केला. गीता ज्ञान पुढच्या पिढीसाठी महत्वाचा उपक्रम असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.