नागपूर : ताडोबा प्रशासनाने गाभा आणि बफर क्षेत्रासह प्रादेशिक विभागातही व्याघ्रपर्यटन सुरू केले आहे. एवढेच नाही तर सफारीच्या नियमित वेळांव्यतिरिक्त सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत ‘नून सफारी’ नावाचा नवाच प्रकार सुरू केला आहे. त्यामुळे ताडोबा प्रशासनाला वाघांच्या सुरक्षेपेक्षा वाघाच्या नावावर मिळणाऱ्या महसुलाची अधिक काळजी आहे का, असा प्रश्न व्याघ्रप्रेमींकडून विचारला जात आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प प्रशासनाने बफर क्षेत्रात व्याघ्रपर्यटनासाठी १४ पर्यटन प्रवेशद्वार सुरू केले. आता तर प्रादेशिकमध्येही सफारी सुरू करण्यात आली आहे. या व्याघ्रप्रकल्पाचे तत्कालीन क्षेत्र संचालक एन.आर. प्रवीण यांच्या कार्यकाळातच हा प्रस्ताव तयार झाल्याचे कळते. मध्य चांदाअंतर्गत कारवा हे नवे प्रवेशद्वार पर्यटनासाठी सुरू करण्यात आले.

हेही वाचा – नागपूर : नवतपात वीज यंत्रणेला आग, वीज खंडित; आगीच्या घटना वाढल्या

याशिवाय शेडेगाव बीटात चिमूरजवळ सफारी लवकरच सुरू होत आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय महामार्गावरील ७५० मीटरच्या भुयारी मार्गाला लागून हे प्रवेशद्वार आहे. मध्य चांदामध्येच जोगापूर व चंद्रपूर प्रादेशिकमध्ये चोरा येथूनही व्याघ्रसफारी सुरू करण्यात आली आहे. त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे, जुनोना येथून ‘नून सफारी’च्या नावाखाली सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत सहा पर्यटक वाहने सोडण्यात येत आहेत.

या सर्व सफारीसाठी ऑनलाईन नव्हे तर प्रत्यक्ष नोंदणी केली जात आहे. शिवाय पर्यटकांना त्यांची वाहने आत नेण्याची मुभा आहे. त्यासाठी प्रवेशशुल्क आकारले जाते. ताडोबा आणि परिसरात पर्यटनाचा भार वाढत असल्याने वाघ बाहेर पडत आहेत. पर्यटक वाहने वाघाला घेराव घालत आहेत. नियमांना बगल देत हा प्रकार सुरू असल्याने वन्यजीवप्रेमींनी त्यावर टीका केली आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात वाघाची वाट अडवण्याचा प्रकार हा संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणाचा कळस आहे. वाघाच्या नावावर पर्यटनात वाढ करायची, पण त्याची सुरक्षा वाऱ्यावर सोडायची हे धोरण राबवले जात आहेत. आता तर प्रादेशिक विभागातही त्यांनी व्याघ्रपर्यटन सुरू केले आहे. दुपारीदेखील काही ठिकाणी सफारी सुरू झाली आहे. अशावेळी वाघ जंगलाबाहेर आलेत तर त्यांना जेरबंद केले जात आहे. हे चुकीचे आहे. – दिनेश खाटे, अध्यक्ष, हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी.

हेही वाचा – उपराजधानीत कोंडतोय झाडांचा श्वास; शेकडो हात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही सफारी सुरू केल्या आहेत, पण त्यामागे व्याघ्रसंवर्धनाप्रती लोकांना जागरूक करणे हा उद्देश आहे. त्यासाठी फार थोडे प्रवेशशुल्क आम्ही आकारतो. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमाअंतर्गतच सर्व नियोजन करण्यात आले आहे. यात कुठेही नियम डावलण्याचा प्रयत्न झालेला नाही. – कुशाग्र पाठक, उपसंचालक, बफरक्षेत्र.