शहरातील बाबुपेठ, हिंदुस्थान, लालपेठ कॉलनी आणि इतर भागात गेल्या ४० ते ५० वर्षांपासून लोकांचे वास्तव्य आहे. नागरी सुविधांची कामे या क्षेत्रात करण्यात आली आहेत. अतिक्रमण झाले त्यावेळी किंवा जनसुविधेची कामे होत असताना वेकोलिला जाग आली नाही. मात्र आता येथील रहिवाश्यांना नोटीस पाठवून त्रास दिला जात आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. पिढ्यानपिपिढ्या वास्तव्यास असलेल्यांना वेकोलिने त्रास देऊ नये, अशा शब्दात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वेकोलिच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
हेही वाचा >>>… अन्यथा नाशिक-मुंबई महामार्गावरील टोल बंद ,खड्ड्यांची पाहणी केल्यावर छगन भुजबळ यांचा इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना घरे देण्याचा संकल्प केला आहे. येथील नागरिकांना वेकोलिने यापुढे कोणतीही नोटीस बजावू नये. अतिक्रमित भूखंड पुन्हा डी-नोटीफाईड करणे आणि गुगल मॅपिंग करण्याची प्रक्रिया राबवावी. तसेच नागरिकांनी भूखंडाचा पट्टा मागण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज सादर करावे. नवीन अतिक्रमण होत असेल तर त्यांना रोखण्यासाठी प्रशासन वेकोलिला सहकार्य करेल. खाण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खाण सुरक्षा अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र लिहून वस्तुस्थितीबाबत अवगत करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.