देवेंद्र गावंडे

राजकारण हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक. त्यामुळे क्षेत्र कोणतेही असो, त्यात राजकारण असतेच. कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे ते डोकावत असते. राजकीय वर्तुळात चालणारे राजकारण हे उघड्या डोळ्यांनी अगदी स्वच्छ दिसते. अन्य क्षेत्रात ते समजून घ्यावे लागते. त्यामुळे अमूक एका क्षेत्रात राजकारण नको अशा भूमिकेलाही अनेकदा अर्थ नसतो. साहित्य क्षेत्राचेही तसेच. हे तर विद्वान, बुद्धिवंताचे क्षेत्र. येथेही राजकारण अगदी पूर्वापार चालत आलेले. साहित्यिकांचे गट, कंपू याला ओळख मिळाली ती राजकारणातूनच. यातून मिळणारे पुरस्कार, उद्भवणारे वाद हेही नित्याचे. अनेक वर्षांपासूनचे. साहित्य वर्तुळात चालणाऱ्या राजकारणावर आधी वर्चस्व होते ते अभिजन वर्गाचे. या क्षेत्रातील संस्था, त्यांच्याकडून भरवली जात असलेली संमेलने, देण्यात येणारे पुरस्कार यावर दबदबा होता तो या वर्गाचा. तेव्हा याही वर्गात गट व कंपूशाही होतीच. परिणामी डावलले जाण्याची तक्रार तेव्हाही होतीच. नंतर हळूहळू बहुजन समाजातील तरुण लिहिते झाले. लेखक, कवी, समीक्षक म्हणून स्थिरावू लागले. साहित्यक्षेत्रात त्यांना मान मिळू लागला. संस्था, संमेलनातला वावर वाढला. आता हा वर्ग या क्षेत्रात बऱ्यापैकी स्थिरावलाय. तरीही गटातटाचे व कंपूशाहीचे राजकारण काही संपले नाही. ते कधीच संपणारही नाही, त्याला कारण मानवी स्वभाव. तो लक्षात न घेता कादंबरीकार रवींद्र शोभणे यांनी अलीकडे या बहुजन वर्गाच्या साहित्यिक जमीनदारीवर परखड भाष्य केले. येत्या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष असलेल्या शोभणेंची अस्वस्थता यातून दिसली. त्यांच्या मते या प्रस्थापित बहुजन साहित्यिकांनी कायम दुटप्पीपणाचे धोरण स्वीकारले. त्यामुळे बहुजन असूनही अनेक साहित्यिकांवर अन्याय झाला. हा अन्याय नेमका कोणता हे शोभणेंनी स्पष्टपणे सांगितले नसले तरी त्यांचा रोख आहे तो साहित्य अकादमीच्या पुरस्काराकडे.

Krishna Janmabhoomi case mathura
‘श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद’ भाजपासाठी फायद्याचा ठरणार? मथुरावासीयांच्या काय आहेत भावना?
Kolhapur, MIM, Mahavikas Aghadi,
कोल्हापुरात ‘एमआयएम’कडे पाठिंबा मागितलेला नसल्याने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही; महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
election material making work increase due to parties splits
पक्षफुटींमुळे प्रचार साहित्याला ‘अच्छे दिन’; झेंडे, टोप्या, फेटे निर्मितीस सुरुवात, चिन्हे जास्त असल्याने कामात वाढ

हेही वाचा >>> लोकजागर : बंदीमागचे ‘बाष्कळ’ सत्य!

गेली अनेक वर्षे सातत्याने लेखन करूनही तो मिळालेला नाही ही शोभणेंची खरी खंत. त्याला जबाबदार बहुजनांची कंपूशाही असे ते म्हणतात. शोभणेंनी या वादाला तोंड फोडले ते एका अर्थाने बरेच झाले. अकादमीच्या पुरस्कार वाटपात भेदभाव केला जातो, नेमाडेपंथीयांना झुकते माप दिले जाते हा आरोप याआधीही अनेकदा झालेला. त्यात अजिबातच तथ्य नाही असेही समजण्याचे काही कारण नाही. मात्र हा आरोप करणारे तसेच शोभणे ज्या अभिजनांच्या कंपूत वावरतात त्यांनी तरी आजवर काय केले? त्यांच्या अधीनस्थ असलेल्या संस्थांनी वाटलेल्या पुरस्कारात भेदभाव झाला नाही का? या दोन्हीची उत्तरे होय अशीच येतात. मग शोभणेंनी ते आहेत तिथली कंपूशाही व भेदभाव मिटवण्यासाठी आजवर नेमके काय केले? ते ज्या विदर्भ साहित्य संघाशी संलग्न आहेत तिथेही पुरस्कार वाटपात वशिलेबाजी चालते हे अनेकदा सिद्ध झालेले. या संस्थेच्या व्यासपीठावर अभिजन वर्गातील ठराविक विचारसरणीचेच लोक पाहुणे म्हणून वारंवार दिसतात. हा योगायोग शोभणेंना मान्य आहे काय? शोभणेंनी त्यांची व्यथा बोलून दाखवत बहुजनांवर टीका करताना स्वत:साठी बलुतेदार असा शब्द वापरला. बलुतेदार याच वर्गात येतात हे ठाऊक असून सुद्धा! याचा नेमका अर्थ काय? शोभणेंना बहुजन म्हणायचे की कुणबी, मराठा व लेवा पाटील यांच्या वर्चस्ववादावर बोलायचे आहे? तसे असेल तर ते स्पष्टपणे या जातीतील लेखकांची नावे का घेत नाहीत? अभिजनवर्गाने मला सांभाळून घेतले असे शोभणे म्हणतात. या वर्गाकडून असे सांभाळून घेणे कंपूशाहीचे द्योतक नाही तर आणखी काय? साहित्यक्षेत्रात कायम सुरू असलेल्या वर्चस्ववादाच्या लढाईत एखादा बहुजन आपल्याही वर्गात हवा असे अभिजनांना वाटले असेल व त्यातून शोभणेंना सांभाळले गेले असेल या तर्काशी ते सहमत आहेत का?

हेही वाचा >>> लोकजागर: सरकारी ‘सरबराई’!

बहुजन वर्गातील गट व कंपूशाहीकडे बोट दाखवताना आपणही विरुद्ध बाजूच्या कंपूशाहीचाच भाग आहोत याचे भान त्यांना राहिले का नाही? मी जिथे आहे तिथे कंपूशाही नाही असे त्यांना वाटत असेल तर मागच्या संमेलनाच्या वेळी सुरेश द्वादशीवारांच्या नावावर फुली मारणे नेमके कशाचे द्योतक होते? जाती, धर्म व वर्गावरून एखाद्या साहित्यिकाचे स्थान ठरवणे हे वाईटच. मात्र आज सर्वत्र तेच सुरू. आजच्या घडीला या क्षेत्रातील बहुतांश व्यासपीठांवर हे बघूनच पाहुणे ठरतात व पुरस्कार वाटले जातात. कंपूशाही समूळ नष्ट व्हायला हवी असे शोभणेंना वाटत असेल तर ते जिथे आहेत तिथूनच या स्वच्छता मोहिमेची सुरुवात का करत नाहीत? आज ते अकादमीवर वर्चस्व असलेल्या बहुजनांच्या वर्गाकडे बोट दाखवतात पण याच अकादमीवर आता त्यांच्याही वर्तुळातील साहित्यिकांचा प्रवेश झालेला. त्यांनीही पुरस्कार ठरवताना आपल्या विचारसरणीला प्राधान्य देणे सुरू केलेले. या नव्याने उदयास येऊ घातलेल्या कंपूशाहीविरुद्ध शोभणे भविष्यात असेच परखड मत व्यक्त करतील का? मुळात कुठल्याही साहित्यिकाला अथवा त्याच्या साहित्यकृतीला जात, धर्म व वर्गाच्या चौकटीत बांधणे गैरच. जो प्रतिभावान व ज्याची साहित्यकृती अस्सल तो जाणीवपूर्वक स्वत:ला अशा चौकटीपासून दूर ठेवतो. राज्यात आदराने घेता येणारी अशी अनेक नावे आहेत. मात्र आजकाल बहुसंख्य साहित्यिकच अशा गट व कंपूशाहीचे भाग होण्यात धन्यता मानतात. कुणा एका गटासोबत राहिले म्हणजे काहीतरी पदरात पडते हीच स्वार्थी भावना त्यामागे असते. शोभणेंनीही हेच केले.

त्यामुळे त्यांनी विरोधी कंपूवर केलेली टीका दखलपात्र ठरते पण प्रशंसनीय नाही. आता मुद्दा राहिला तो पुस्कार मिळण्याचा. यावेळी ‘रिंगण’ला तो मिळाला. त्याच्यासाठी जे तीन परीक्षक नेमले, त्यातले दोन उजव्या कंपूतले. तरीही त्यांनी या नेमाडेपंथीय लेखकाची शिफारस केली असेल तर तो त्या साहित्यकृतीच्या अस्सलपणाचा गौरव ठरतो. अशीच पद्धत पुढेही राहावी व जे अस्सल त्याची निवड व्हावी असे शोभणेंनी म्हटले असते तर ते अधिक शोभून दिसले असते. स्वत:च्या पुस्तकांना आजवर हा सन्मान का हुलकावणी देत राहिला यावर शोभणेंनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे. त्यांचे लेखन भरपूर. ते वास्तववादीही पण रंजकतेकडे झुकणारे. एकेकाळी स्वप्नरंजनात रमणाऱ्या मराठी साहित्याला वास्तववादाची वाट दाखवली ती दलित साहित्याने. नंतर बोराडे, शंकर पाटील, मिरासदार यांनी तोच वसा पुढे नेला. आता अभिव्यक्तीचे वेगवेगळे मार्ग चोखाळण्याचा काळ. त्यात शोभणे कमी पडत असतील म्हणूनच मराठीतील हरिश्चंद्र थोरात, चंद्रकांत पाटील, बांदीवडेकर, रसाळ सारख्या समीक्षकांनी त्यांच्या लेखनाची समीक्षा टाळली असावी. तरीही ते पुरस्कार का मिळत नाही म्हणून त्रागा करत असतील तर ते अयोग्यच. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी आता या क्षेत्रातील कंपूशाही नष्ट करण्यासाठी पुढाकार घ्यावा व पुरस्काराचे दु:ख विसरावे. डॉ. सुधीर रसाळांसारख्या नामवंत समीक्षकालाही तो मिळाला नाही याची जाण त्यांनी ठेवली तर तेवढेच त्यांचे दु:ख कमी होईल. शोभणे हे खरेच करतील का?

devendra.gawande@expressindia.com