नागपूर : आधी आपला समाज राजकीय नेता, गुन्हेगार, खेळाडू आणि अभिनेत्यांमध्ये नायक शोधायाचा. पुढे चित्र बदलले आणि त्यातील राजकीय नेते आणि गुन्हेगार एकत्र यायला लागले. आता तर देशच गुन्हेगार चालवत आहेत. आमच्या काळात किमान गुंडांना गुंडगिरी उघडपणे करण्यात लाज वाटत होती. आता मात्र असे कृत्य निर्लज्जपणे केले जाते, असे परखड मत ज्येष्ठ हिंदी कवी अशोक वाजपेयी यांनी व्यक्त केले.

विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघाच्या अमेय दालनात शनिवारी ज्येष्ठ संपादक प्रकाश दुबे यांनी वाजपेयी यांची मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर उपस्थित होते. या मुलाखतीतून वाजपेयी यांनी राजकीय नेत्यांचे अनेक किस्से सांगताना त्यावर कठोर भाष्यदेखील केले. असाच एक किस्सा त्यांनी मध्यप्रदेशातील ‘भारत भवन’ या विविध कला, सांस्कृतिक केंद्र आणि संग्रहालयाचा सांगितला. या केंद्रावर मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मोतीलाल व्हाेरा यांनी वर्चस्व मिळण्यासाठी प्रयत्न केले, पण त्यात ते अपयशी ठरले. या ‘भारत भवन’वरील नियमावलीवरुन प्रशासक, राजकीय नेते सारेच नाराज होते. येथे कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन होत नव्हते, दीप प्रज्वलन नव्हते, माल्यार्पण नव्हते. त्यामुळे या सर्वांना मिरवण्यासाठी येथे कोणतीही संधी मिळत नव्हती, ही आठवण त्यांनी सांगितली. मध्यप्रदेशात राज्य सरकारला संस्कृती जपण्यासाठी रंगमंडळ स्थापन करावे लागले, कारण येथे नाट्यप्रेमी नाहीत. महाराष्ट्र मात्र नाट्यप्रेमींनी भरलेला आहे, असे कौतुक देखील त्यांनी केले. वर्धेतील आंतरराष्ट्रीय विद्यापीठावर देखील त्यांनी टीका केली. माझ्या कल्पनेतील विश्वविद्यालयापेक्षा ते फार लांब आहे. त्याला आंतरराष्ट्रीय असे नाव असले तरी ते आंतरराष्ट्रीय आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

नागपुरात खाकी- खादीत महाकाव्यात्मक संघर्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूर शहरात खाकी आणि खादीत महाकाव्यात्मक संघर्ष आहे. खादीचा प्रकल्प शहरापासून काहीच किलोमीटर अंतरवार आहे आणि खाकीबद्दल आपण सारे जाणताच. हिंदी व मराठी या दोन्ही भाषा नागपूर शहरात एकत्र नांदतात, ही देखील नागपूरची एक ओळख आहे. एकेकाळी मुक्तीबोधसाठी हे शहर ओळखले जात होते, आता ते नाटककार महेश एलकुंचवार यांच्यासाठी ओळखले जाते, असेही वाजपेयी म्हणाले.