नागपूर : शहरात गेल्या तीन दिवसांपासून नागपूर पोलिसांनी भिकारी बंदी माेहीम सुरू केली आहे. या क्रमात आता नागपूर पोलीस भिकाऱ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करणार आहेत. शहराची कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची मुख्य जबाबदारी सांभाळणारा पोलीस विभाग आता भिकाऱ्यांच्या उत्थानासाठी काम करणार आहे. हे विशेष.

सामान्य नागरिकांना त्रास होत असल्याने शहरात भिकारी बंदी मोहीम सुरू केल्याचे सांगून नागपूर पोलिसांनी शहरात भीक मागणाऱ्यांवर बंदी घातली होती. भीक मागताना दिसल्यास त्याच्यावर थेट गुन्हा दाखल करण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढला होता. आदेश निघाल्यानंतर पोलीस निरीक्षकांनी आपापल्या हद्दीतील भिकाऱ्यांची धरपकड सुरु केली होती.

हेही वाचा >>> नागपूर : भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम म्हणतात २०२४ च्या निवडणुकीत ईव्हीएम मशीन फोडा

पोलिसांचा आक्रमक पवित्रा बघताच भिकाऱ्यांची धावपळ झाली. अनेकांनी मुख्य चौक सोडून कुठेतरी उद्यानात, वस्तीत, मंदिराजवळ किंवा धार्मिक स्थळाजवळ आश्रय शोधला. त्यामुळे अनेक भिकारी रस्त्यावर नाहीत. येत्या २० ते २१ मार्च रोजी जी-२० चे पथक नागपुरात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी भिकारीबंदीचा निर्णय घेतल्याचे बोलले जात होते. मात्र, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज शनिवारी आयोजत पत्रकार परिषदेत याबाबत स्पष्टीकरण दिले असून भिकाऱ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

म्हणे, बातमी वाचून भिकारी पळाले!

आजच्या पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्तांनी अजब दावा केला. अनेक भिकारी हे वृत्तपत्रातील बातमी वाचून आपापल्या गावी गेल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित भिकाऱ्यांची निवास, भोजन आणि वैद्यकिय सुविधेची सोय करण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.