लोकसत्ता टीम

चंद्रपूर : बारा दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करणारे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभागात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान मराठा व धनगर समाजाचे समाधान करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने ओबीसी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेल्या बारा दिवसापासून रवींद्र टोंगे यांचे आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी त्यांची प्रकृती खालावली. मात्र त्यांनी रुग्णालयात उपचारासाठी स्पष्ट नकार दिला. ओबीसी समाजासाठी उपोषण मंडपात मी प्राण त्यागायला तयार आहे असे म्हणत ते मंडपात राहिले.

आणखी वाचा-एमपीएससीच्या अध्यक्षपदासाठी रजनीश सेठ यांचे नाव आघाडीवर?

दरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांचा रक्तदाब व शुगर खूप कमी झाली. त्यांची प्रकृती खूप चिंताजनक असल्याचे डॉ. धगडी यांनी सांगितले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी हलविले नाही तर प्रसंगी त्यांच्या जीवाचे वाईट होऊ शकते असे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेत्यांनी मंडपात तातडीने एकत्र यावे असा संदेश सर्वांना देण्यात आला. बघता बघता सर्व जण एकत्र आले. त्यानंतर डॉ. धगडी यांनी तपासणी केली व टोंगे यांना रुग्णालयात हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. दरम्यान ११.३० च्या सुमारास टोंगे यांना वैद्यक महाविद्यालयातील अतिदक्षता विभागात उपचारार्थ दाखल केले.

आणखी वाचा-अबब! ७ ग्रॅमला ३२ हजार रुपये, सोन्याएवढ्या महाग ‘मॅफेड्रॉन’ मादक पदार्थाची तस्करी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासंदर्भात ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी माध्यमांशी बोलताना टोंगे यांचे उपोषण रुग्णालयात सुरूच राहणार असे सांगितले. तर आजपासून विजय बलकी आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती दिली. मराठा व धनगर समाजाचे समाधान करणाऱ्या व ओबीसी समाजाकडे कायम दुर्लक्ष करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षांना आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समस्त ओबीसी बांधव धडा शिकवतील, असा इशारा राजूरकर यांनी दिला आहे.