नागपूर : राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास चालढकल करीत आहे. या मागणीसाठी मराठा समाज मुंबईत धडक देणार आहे. त्यासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत जरांगे यांनी सरकारला आव्हान देत मागणी मान्य करा आणि नाहीतर सरकार पाडू, असा इशारा दिला. त्यावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगकडे आमदार किती, असा सवाल केला आहे.

ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे. मराठा आरक्षण मिळाले नाही तर मनोज जरांगे सरकार पाडण्याची भाषा करताहेत, त्यांच्यामागे आमदार किती असा सवाल तायवाडे यांनी विचारला. तसेच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाकडे आमचे लक्ष असेल ,असेही ते म्हणाले.

जरांगेनी राज्य सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. नाहीतर सरकार उलथून टाकेन असे म्हटले. येत्या २९ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. राज्य सरकारने मराठा आरक्षणाची मागमी मान्य करण्यासाठी आणखी दोन दिवस आहेत असा इशारा त्यांनी दिला.

त्यावेळी माघार का घेतली?

मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमवर ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, सरकार उलथून टाकायचे होते तर विधानसभा निवडणुकीतून माघार का घेतली? तेव्हाच आपले उमेदवार उभे करून मोठ्या संखेने आमदार निवडून आणायचे होते. तसे केले नाही आणि आज सरकार उलथून टाकण्याची भाषा करता. मनोज जरांगे यांच्या याच भूमिकेमुळे त्यांना कोणी गांभीर्यन घेत नाही.

ओबीसी महासंघाचे आंदोलनावर लक्ष

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे लक्ष हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि सरकारच्या भूमिकेवर आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केलं. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर या आधी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघ यांनीही टीका केली आहे.

दोन दिवसांचा अल्टिमेटम

२९ ऑगस्टला कोणत्याही परिस्थितीत मुंबईमध्ये आंदोलन करणार असल्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी केलाआहे .मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी आंतरवाली सराटीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मराठ्यांना सर्व कामधंदे बाजूला ठेवून मुंबईमध्ये येण्याचे आवाहन केलं. तर फडणवीसांना दोन दिवसांचा अल्टिमेटमही जरांगेंनी दिला. तसंच आरक्षण न दिल्यास सरकारही उलथून टाकण्याचा इशाराही जरांगेंनी दिला.