नागपूर: ओबीसीमधून आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हैद्राबाद गॅजेटचा शासन निर्णय काढत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. यानंतर मनोज जरांगे यांचे आंदोलन शांत झाले असले तरी राज्यातील ओबीसी समाज मात्र आक्रमक झाला आहे.
विदर्भामध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी १० ऑक्टोबरला मोठा मोर्चा आयोजित केला आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनीही मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयावरून सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. यानंतर भुजबळ आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातूनच ओबीसी आरक्षणासाठी सरकारला इशारा देणार आहेत.
महात्मा फुले समता परिषद, विविध ओबीसी संघटना व बहुजन यांनी मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसीमधून आरक्षण देण्यास तीव्र विरोध केलेला आहे. असे असताना राज्य शासनाच्या मराठा मंत्रिमंडळ उपसमितीच्या शिफारशीने, मराठा आंदोलकांच्या दबावात येवून २ सप्टेंबर २०२५ ला काळा शासन निर्णय काढून, मराठा जातीला कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा शासन निर्णय काढून, संविधान, उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निकाल, जात पडताळणीचा कायदा हे सारे डावलून, ओबीसींची फसवणूक केलेली आहे. त्याचा ओबीसी बहुजनांकडून सर्वत्र निषेध होत असून, अनेक ओबीसी युवक तरुण ओबीसींचे आरक्षण या घुसखोरीमुळे संपले या नैराशेपोटी आत्महत्त्या करीत आहेत. हे लोण मराठवाड्यातून आता विदर्भामध्येही पोचण्याची शक्यता आहे.
युवकांना आत्महत्तेपासून परावृत्त करण्याची गरज आहे. पण हा बेकायदेशीर शासन निर्णय रद्द करण्याची दखल राज्य शासन अजून घेत नाही. यासाठी ओबीसी, विजेएनटी, एसबीसी या बहुजनांचा आवाज बुलंद करण्यासाठी, नागपूर येथे गुरुवार १८ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता, महात्मा फुले सभागृह, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मार्ग, रेशीमबाग नागपूर येथे ओबीसी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात ओबीसींचे नेते छगन भुजबळ हे मार्गदर्शन करणार आहे. राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले भुजबळ थेट मुख्यमंत्र्यांच्या शहरात सभा घेणार असल्याने एक प्रकारे सरकारलाच आव्हान करणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे.
मराठा आरक्षणावर भुजबळांची भूमिका काय?
मराठा समाजासाठी स्वतंत्र १० टक्के आरक्षण आधीच दिलेले आहे, तसेच ईडब्ल्यूएसच्या आरक्षणातील १० टक्क्यांपैकी ८० टक्के वाटा मराठा समाजालाच मिळतो, त्याशिवाय ओपनमधील ५० टक्क्यांतील बहुतांश वाटा मराठा समाजाला मिळत असताना ही सर्व आरक्षणे तुम्हाला नको आहेत का ? आधीची मिळणारी ही सर्व आरक्षणे रद्द करायची आहेत का ? की केवळ ओबीसींमध्येच आरक्षण हवे आहे, त्याचे उत्तर मराठा समाजाने द्यावे. तेदेखील ज्यांना आरक्षण म्हणजे काय ? हे समजते अशा सुशिक्षित नेतृत्वानेच द्यावे, असा उपरोधिक टोला भुजबळ यांनी जरांगे यांना एका कार्यक्रमात लगावला आहे.