यवतमाळ : नेर वीज वितरण कार्यालयातील अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्याची एका ढाब्यावर रंगलेली मेजवानी चांगलीच व्हायरल झाली आहे. मद्याचे घोट रिचवत रंगलेला संवाद महिलेच्या अश्लील संभाषणाने चांगलाच चर्चेत आला आहे. या प्रकाराने महावितरणच्या वर्तन नियमाचे पुरते धिंडवडे निघाले आहे.
नेर वीज वितरण कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यवतमाळ रोडवरील एका ढाब्यावर मेजवानीचा बेत आखला. यात नेर कार्यालयातील लिपिक महिला कर्मचारी, मालखेड येथील कनिष्ठ अभियंता यांच्यासह रोजंदारी तत्वावरील कर्मचारी सहभागी होते. जेवणासोबतच दारूचेही प्याले रिचविले गेले. हे सर्व दृष्फितीत दिसते.
दरम्यान, हा प्रसंग तेथे असलेल्या एका व्यक्तीच्या फोनमध्ये रेकॉर्ड करण्यात आला. यावेळी मद्यधुंद लिपिक महिलेने बोलताना अश्लील भाषेचा वापर केल्याचे दिसून येते. सार्वजिक सेवा पुरविणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी अशाप्रकारे खुलेआम दारू पिऊन अश्लाघ्य भाषेचा वापर करणे, आपल्या संस्कृतीला शोभत नाही, अशी टीका त्यांच्यावर होत आहे.
ग्रामीण भागात वीज पुरवठा आणि संबंधित तक्रारींचा निपटारा करण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर आहे. परंतु, त्यांच्या या कारनाम्यामुळे वीज वितरण विभागात कार्यरत अन्य प्रामाणिक कर्मचाऱ्यांनाही खाली पहायाची वेळ आली आहे. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा अधीक्षक अभियंत्यांनी केल्या आहे. अहवाल येताच दोषींवर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता अशोक साळुंखे यांनी सांगितले.
विजेचा पुरवठा सुरुळीत करण्यासोबतच समस्यांचे निवारण करण्याची जबाबदारी वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. या विभागातील बहुतांश कर्मचारी व्यसनाधीन आहेत. कर्तव्यावर असतानाही ते मद्य घेऊन असतात. त्यांच्याजवळ जाताच दारूचा उग्र वास येतो, असा अनुभव सोनखास, सोनवाढोणा, मालखेड खुर्द, येलगुंडा तसेचं इंद्रठाणा येथील गावकऱ्यांनी सांगितला. या व्यसनी कर्मचाऱ्यांकडून दारूच्या नशेत काम करताना अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने अशा कर्मचाऱ्यांवर वेळीच आवर घालावा, अशी मागणी आहे.
‘त्या‘ महिलेचा उत्तरवाढोणा येथे नशेत गोंधळ
यवतमाळ ते नेर मार्गावर असलेल्या उत्तरवाढोणा या गावात याच महिला लिपिकेने नशेत गोंधळ घातल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. गावातील काही वीज ग्राहकांचे देयके कमी करून देण्यासाठी तिने पैशाची मागणी केल्याचा आरोप येथील युवासेना जिल्हा प्रमुख सुमित खांदवे यांनी केला आहे. या महिलेने दारूच्या नशेत गावात येऊन वीज देयके कमी करण्यासाठी पैसे मागितले. कोणत्या ग्राहकाकडून किती पैसे उकळ्याल्या गेले याचा पुरावा असल्याचा दावा या कार्यकर्त्याने केला आहे. यासंदर्भात २६ जुलै रोजी पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे तक्रार नोंदविण्यात आली. या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींचे निलंबन व्हावे, अशी मागणी यात करण्यात आली आहे.