नागपूर : नागपूर येथील वन्यजीव छायाचित्रकार आणि नॅशनल जिओग्राफिक संशोधक प्रसेनजीत यादव यांचे दुर्मिळ काळ्या वाघाचे छायाचित्र नॅशनल जिओग्राफिक मासिकाच्या ऑक्टोबर २०२५च्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

ओडिशातील सिमिलीपाल राष्ट्रीय उद्यानातून हे छायाचित्र घेण्यात आले. या एकमेव व्याघ्रप्रकल्पात दुर्मिळ काळे वाघ आढळतात. घनदाट जंगलात अनेक महिने मागोवा घेतल्यानंतर त्यांना हे छायाचित्र मिळाले. सिमिलीपालमध्ये ‘स्युडो-मेलॉनिस्टिक’ म्हणून ओळखले जाणारे काळे वाघ आहेत. येथील सुमारे ३० वाघांपैकी निम्म्याहून अधिक वाघांमध्ये हे दुर्मिळ आनुवंशिक उत्परिवर्तन दिसून येते.

या वाघाचे छायाचित्र घेण्यासाठी यादव यांनी तब्बल तीन महिन्यांहून अधिक काळ याठिकाणी घालवला. यादरम्यान त्यांनी प्राण्यांचे निरीक्षण करण्यासोबतच त्यांच्या हालचाली, वर्तनाचा अभ्यास केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि त्यांनी काढलेले छायाचित्र नॅशनल जिओग्रॉफिक मासिकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आले.या सन्मानामुळे यादव यांनी अशा भारतीय छायाचित्रकारांच्या निवडक गटात स्थान मिळवले ज्यांच्या कामाने १३५ वर्षांच्या गौरवशाली इतिहासात मासिकाच्या मुखपृष्ठाला सजवले.

हिस्लॉप महाविद्यालयात जैवतंत्रज्ञानाचे शिक्षण

नागपुरातील परांजपे शाळा, नीरी शाळा येथून शिक्षण घेतलेल्या प्रसेनजीत यांनी हिस्लॉप महाविद्यालयातून जैवतंत्रज्ञानाचे शिक्षण घेतले. वयाच्या २०व्या वर्षी ते बंगळुरूला गेले आणि तेथूनच त्यांचा नॅशनल जिओग्रॉफिक संशोधक म्हणून प्रवास सुरू झाला. नागपूर येथील मानद वन्यजीव रक्षक व साहसी उपक्रम राबवणारे उधमसिंग यादव आणि साधना यादव यांचे ते सुपूत्र आहेत. २०१४ मध्ये त्यांना एक्सपिडिशन कौन्सिल अंतर्गत नॅशनल जिओग्राफिक संशोधनासाठी अनुदान मिळाले. नेटजीओसाठी त्यांचा पहिला प्रकल्प आकाशातील बेटांचा शोध घेणे आणि दक्षिण पश्चिम घाटात आढळणाऱ्या उभयचर, सरपटणारे प्राणी, पक्षी आणि सस्तन प्राण्यांच्या अदृश्य प्रजातींचे दस्तऐवजीकरण करणे हा होता.

अनेक महिन्यांच्या संयमाचे फलित

नॅशनल जिओग्राफिकचा छायाचित्रकार आणि संशोधक म्हणून ओडिशातील सिमलीपाल आणि महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या जंगलात जाणे हा खरोखरच एक आनंददायी अनुभव आहे. महाराष्ट्र आणि ओडिशा वनविभागाचे समर्पित, व्यवस्थापन आणि वाघांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्यांच्या अधिकाऱ्यांची वचनबद्धता मी प्रत्यक्ष पाहिली. ‘टी-१२’चे छायाचित्रण म्हणजे अनेक महिन्यांच्या संयम होता. आता नॅशनल जिओग्राफिक मासिकाच्या आंतरराष्ट्रीय मुखपृष्ठावर ते पाहणे, हा एक सन्मान आहे. भारताच्या असाधारण वन्य हृदयाचे आपण दस्तऐवजीकरण का करतो, याची ते आठवण करून देणारे ते चित्र आहे, असे प्रसेनजीत यादव म्हणतो.