नागपूर: विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या सातव्या दिवशी विरोधकांनी बेरोजगारांची थट्टा करणाऱ्या सरकारचा निषेध करत विधानभवन परिसरात प्रतिकात्मक भजी तळली. यावेळी सत्ताधाऱ्यांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

महाविकास आघाडीतील आमदारांनी ‘पेपरफुटी झाली, काय दिवे लावले’, ‘भरतीची घोषणा, काय दिवे लावले’, ‘बेरोजगारी वाढली, काय दिवे लावले,’ ‘पीएचडीधारकांची थट्टा, काय दिवे लावले’, अशा घोषणा देत शुक्रवारी विधानभवन परिसर दणाणून सोडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘पीएचडी करून काय दिवे लावणार’ असे वक्तव्य केले होते. त्यावरून त्यांच्यावर बरीच टीका झाली. त्यांचे वाक्य बरेच ट्रोल झाले. त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसेच माझ्या बाजूने हा विषय संपल्याचे जाहीर केले आहे. मात्र, विरोधकांनी त्यांच्या ‘काय दिवे लावले’ या वाक्याला धरून शुक्रवारी बेरोजगारीच्या मुद्द्यावर जोरदार आंदोलन केले. यावेळी आंदोलनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, रवींद्र धंगेकर, सचिन अहिर, सतेज पाटील, रोहित पवार, के. सी. पाडवी आदींचा सहभाग होता.

हेही वाचा – नागपूर : शिक्षिकेला सुटी मंजूर करण्यासाठी मुख्याध्यापकाची शारीरिक संबंधाची मागणी

हेही वाचा – एकीकडे थंडीत वाढ, तर दुसरीकडे पावसाचा अंदाज!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेरोजगारी हटविण्यासाठी गॅरंटी देणार का?

बेरोजगारीवर सरकार गंभीर नाही, सर्वच परीक्षांमध्ये पेपरफुटी वाढली आहे. सरकार यावर कुठलीही कारवाई करत नसल्याचे चित्र आहे. मोदींची गॅरंटी म्हणून सरकारचे मंत्री सांगताहेत तशी गॅरंटी बेरोजगारी हटविण्यासाठी देणार का, असा प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. सरकार बेरोजगारीच्या मुद्द्यावर गंभीर नाही. रोजगार देण्याऐवजी भजी तळण्याचा सल्ला सरकार देत आहे. त्यामुळे भजी तळून सरकारचा निषेध करण्यात आला आहे, असे अंबादास दानवे यांनी सांगितले.