लोकसत्ता टीम

चंद्रपूर: संपाच्या तिसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालये, २५०० शाळा, जिल्हा सामान्य रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा परिषद, महापालिकेच्या आस्थापनातील ९० टक्के कर्मचारी संपावर असल्याने सर्व सोईसुविधा ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे शेकडो नागरिकांना ताटकळत राहावे लागले. जिल्ह्यातील बहुतांश शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. तर, वैद्यकीय महाविद्यालयात कर्मचाऱ्याअभावी रुग्णांची फरफट होत आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करा, या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील ९० टक्के सरकारी कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे शासकीय आस्थापने ओस पडली आहेत. संपाच्या तिसऱ्या दिवशीसुद्धा कर्मचारी संपावर ठाम असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय, १५ तहसील व १५ पंचायत समिती कार्यालये, कृषी विभाग, महसूल, बांधकाम, जिल्हा परिषद, नगरपरिषद, महापालिकेचे कामकाज ठप्प पडले आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विभागप्रमुखांना मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश दिले असून त्यांच्यावर कार्यालय सुरू करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. विभागप्रमुख कार्यालय सुरू करून बसले असले तरी, कर्मचारीच नसल्याने काम ठप्प पडले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व १५ तहसील कार्यालयात कर्मचारी नसल्यामुळे कामासाठी गेलेल्या नागरिकांना रिकाम्या हाती घरी परतावे लागले आहे. कार्यालये सुरू आहेत मात्र, कर्मचारी नाही अशी अवस्था झाली आहे.

आणखी वाचा- जुन्या पेन्शनसाठी संप अन् आरोपींना कंप, जामीन नाहीच

बहुतांश शाळांत शिक्षकच नाहीत!

जिल्ह्यात २५०० च्यावर शाळा आहेत. शिक्षक सुद्धा संपात सहभागी झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. संपामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून काही ठिकाणी शाळा सुरू केल्या आहेत. याठिकाणी गावातील उच्चशिक्षित तरुण शाळकरी विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करीत आहे. शाळा सुरू आहे मात्र, शिक्षक नसल्याची परिस्थितील जिल्हाभरातील शाळांची आहे.

शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचे लाडबोरीत रास्ता रोको

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संपामुळे शिक्षक शिकवायला येत नसल्यामुळे सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथील विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी रास्ता रोको आंदोलन केले. मागील दोन दिवसांपासून शाळेत शिक्षक आले नाहीत. त्यामुळे लाडबोरी प्राथमिक शाळा वर्ग १ ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी सिंदेवाही-नवरगाव रस्ता अडवून धरला. शिक्षकांच्या संपामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. प्रशासकीय अधिकारी व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन विद्यार्थ्यांची समजूत काढली. त्यानंतर तात्काळ दोन शिक्षकांची नियुक्ती केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. विशेष म्हणजे, चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षकांसाठी तीनदा रास्ता रोको आंदोलन झाले आहे.