भंडारा : ‘तूने मेरेको चाकू से मारा था. अब तेरेको मारना है…’ आणि सुरू होतो पाठलाग. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एकजण वाट दिसेल तिकडे पळत सुटतो. त्याच्या मागे हातात चाकू घेतलेला ‘तो’ असतो. पळणारा थेट न्यायाधीशांच्या कक्षात शिरतो. न्यायाधीशही प्रसंगावधान दाखवतात. पोलिसांना पाचारण करतात आणि आरोपीला अटक होते. हे एखाद्या चित्रपटातील दृश्य नाही. तर भंडारा जिल्हा न्यायालय परिसरात बुधवारी घडलेली घटना आहे. यात पळणारा आणि पाठलाग करणारा दोघेही आरोपी आहेत हे विशेष.

भंडारा जिल्हा न्यायालय परिसरात बुधवारी दुपारी एका आरोपीने दुसऱ्या आरोपीवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायाधीश आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. साद जाहिदजमा कुरेशी (वय २०) असे बुधवारी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या इतर साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम रामटेके आणि साद कुरेशी यांच्यात जुने भांडण आहे. शुभम विरुद्ध भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : देशभरातील ‘एटीएम’ फोडणाऱ्या उत्तर प्रदेशच्या टोळीला नागपूरात अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यासंदर्भात पेशी असल्याने शुभम हा रितिक वासनिक आणि साहिल बांबर्डे यांच्यासह बुधवारी सकाळी जिल्हा न्यायालयात आला होता. दरम्यान, दुपारी १ वाजताच्या सुमारास साद कुरेशी हा त्याच्या तीन साथीदारांसह न्यायालय परिसरात आला. चाकू घेऊन तो शुभमच्या मागे धावू लागला. या प्रकारामुळे शुभम घाबरला आणि पळत सुटला.धावत असताना तो न्यायाधीशांच्या कक्षात शिरला आणि कुरेशी मागावर असल्याचे त्यांना सांगितले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत न्यायाधीशांनी पोलिसांना पाचारण केले.पोलिस येत असल्याचे दिसताच कुरेशी आणि त्याच्या साथीदारांनी पळ काढला. मात्र, न्यायालयाच्या पार्किंगमध्ये कुरेशी याला पकडण्यात पोलिसांना यश आले. तर त्याचे इतर तीन साथीदार पळून गेले. याप्रकरणी भंडारा पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.