लोकसत्ता टीम
भंडारा : शेजारी शेजारी राहणारी दोन लहान मुले खेळत होती. खेळताना दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. मात्र या वादात घरातील मोठी मंडळी पडली त्याचा शेवट हत्या करण्यापर्यंत गेला. दिवसाढवळ्या घडलेल्या खुनाच्या घटनेने भंडारा पुन्हा एकदा हादरले आहे. शहरातील राणी लक्ष्मीबाई वॉर्डात हलधरपुरी परिसरात युवकाने लोखंडी रॉड डोक्यात घालून वृद्धाला यमसदनी धाडले. तर मृताचा मुलगा आणि पत्नीवर प्राणघातक हल्ला केला यात ते दोघही मायलेक गंभीर जखमी झाले. ही खळबळजनक घटना गुरुवारी सायंकाळी ५.३० ते ६ वाजताच्या सुमारास घडली. शालिकराम शहारे (६५) असे मृताचे तर अक्षय साहू (२५) असे मारेकरी युवकाचे नाव आहे.
या हल्ल्यात किशोर उर्फ कालू शहारे, मीरा शालिकराम शहारे हे दोघे मायलेकसुद्धा जखमी झाले. प्राप्त माहितीनुसार राणीलक्ष्मीबाई वॉर्डातील हलधरपुरी भागात दगडीबोडी परिसरात मृतक आणि आरोपी यांची घरे एकमेकांना लागून आहेत. घरातील लहान मुले खेळत असताना त्यांच्यात किरकोळ वाद झाला. लहान मुलांच्या वादात मोठ्या माणसांनी हस्तक्षेप केला. मृतक शालिकराम शहारे आणि मारेकरी युवक अक्षय साहू याचे वडील यांच्यात जोरदार भांडण झाले. या भांडणात अक्षय साहू व शालिकराम यांचा मुलगा किशोर उर्फ कालू या दोघांनीही उडी घेतली. शाब्दिक बाचाबाचीवरून प्रकरण हमरीतुमरीवर व हातघाईवर आले.
आणखी वाचा-नागपूर- पुणे ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांची लूट थांबणार
तेवढ्यात रागाच्या भरात अक्षय घरात गेला आणि लोखंडी रॉड घेवून बाहेर आला. त्या लोखंडी रॉडने त्याने शालिकरामच्या डोक्यावर जोरदार वार केला. यात डोक्याची कवटी फुटल्याने शालिकराम जागीच गतप्राण झाला. अक्षयने लोखंडी रॉडने शालिकराम यांचा मुलगा किशोर व पत्नी मीराबाई यांच्यावरसुद्धा हल्ला करून जखमी केले व घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती नागरिकांनी भंडारा पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तिघांनाही जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविले. पसार झालेला आरोपी अक्षय याला तपासादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतले असून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी अक्षय हा एका सर्व्हीस सेंटरमध्ये काम करीत असल्याची माहिती आहे. मुलांच्या वादात हस्तक्षेप केल्याने प्रकरण विकोपाला जावून त्याचे पर्यवसान खूनाच्या घटनेत झाले. गेल्या काही महिन्यात जिल्ह्यात खूनसत्रांनी जिल्हा हादरला असून शांतता, सुरक्षा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.