नागपूर : एकतर्फी प्रेमात अंधळा झालेल्या माथेफिरूने गुरुवारी तरुणीवर प्राणघातक चाकू हल्ला केल्याचा संतापजनक प्रकार खापरखेडा परिसरातल्या गुमथी गावात घडल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी गावातील हनुमान मंदिर परिसरात हा थरार घडला. आरोपीने २० वर्षीय मुलीवर हा प्राणघातक हल्ला चढवत तिला गंभीर जखमी केले.
तरुणाचा वार चुकवताना मुलीच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळत असून तिने हाताची चार बोटे गमावल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. गुमथी येथील रहिवासी रोशन दीपक सोनेकर (३२) हा विवाहित आहे. तरीही तो गेल्या काही वर्षांपासून मुलीचा पाठलाग आणि छळ करत होता. तो दारू पिऊन मुलीला सतत मानसिक त्रास देत असे. त्याच्या अशा बेताल वागण्यावरून काही महिन्यांपूर्वी त्याची रोशनची पत्नीही त्याला सोडून गेली.
मुलीने रोशनला स्पष्टपणे नकार दिला होता. तरीही तो सतत वाटते थांबवत होता. २५ एप्रिलला कोराडी नाका येथे त्याने भरदिवसा मुलीवर हात उचलला आणि नंतर घरात घुसून तिला मारहाणही केली होती. कोराडी पोलीस ठाण्यात याची तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतु कठोर कारवाई न झाल्याने आरोपीचे मनोधैर्य वाढले.
सतत मानसिक छळाला तोंड देत असलेल्या या मुलीला बीएससी नर्सिंगचे शिक्षणही सोडावे लागले होते. गुरुवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे मंदिरात पूजेसाठी गेली तेव्हा रोशनही तिच्या मागे मागे मंदिरात आला. त्याने भाजी कापणाऱ्या चाकूने तिच्या मानेवर हल्ला केला. तो दुसरा हल्ला करणार असतानाच मुलीने धाडस दाखवले आणि चाकू पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु या प्रयत्नात तिच्या डाव्या हाताची चार बोटे कापली गेली.
खासगी रुग्णालयात उपचार
रक्तबंबाळ अवस्थेत ती कशीबशी घरी पोहोचली आईला संपूर्ण घटनेची माहिती दिली. कुटुंबीयांनी तिला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथून प्राथमिक उपचारानंतर तिला नागपूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण गावात संतापाचे वातावरण आहे. खापरखेडा पोलिसांनी आरोपी रोशन सोनेकरविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.