नागपूर: लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ५ नोव्हेंबरला नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन हरियाणातील विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोपवजा ‘हायड्रोजन बॉम्ब’ टाकला. भाजपा व निवडणूक आयोगाने संगन्मताने २५ लाख मतांची चोरी केल्याचा दावा देखील राहुल गाधी यांनी यावेळी केला. यासह त्यांनी काही कथित पुरावे देखील सादर केले.
एकाच मतदाराच्या वेगवेगळ्या नावांसह वेगवेगळ्या नोंदी, अनेक मतदारांच्या नावापुढे सारखाच पत्ता, त्यांच्या वयांमधला गोंधळ असे अनेक प्रकार राहुल गांधी यांनी यावेळी सादर केले. राहूल गांधी यांनी एकीकडे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला असताना दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी सुरू झाल्या आहेत. पदवीधर मतदार संघाची ऑनलाईन नोंदणी सुरू असताना काय गोंधळ उडाला पाहूया…
नेमकी अडचण काय?
नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी ६ नोव्हेंबर शेवटचा दिवस आहे. मात्र, ऑनलाईन अर्जांची नोंदणी करताना पदवीधरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अर्ज करताना तो पूर्ण भरला जात नाही. तर कधी अर्ज भरण्यात आला तर तो जमा (सबमिट) करण्यास संपूर्ण दिवस जात आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करणारे पदवीधर मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या तयार करण्याकरिता कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. ३० सप्टेंबर रोजी मतदार नोंदणीची जाहीर सूचना प्रसिद्ध झाली असून ६ नोव्हेंबरपर्यंत याबाबत दावे स्वीकारण्यात येणार आहे. तर अंतिम मतदार यादी ३० डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या विशेष मतदार नोंदणी मोहिमेत नागपूर विभागातील सर्व पदवीधरांनी सहभाग घेऊन नोंदणी करावी, असे आवाहन नागपूर विभागाच्या मतदार नोंदणी विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र, संकेतस्थळाच्या तांत्रिक गोंधळामुळे पदवीधर नोंदणीपासून वंचित राहणार आहेत.
पदवीधर नोंदणी करत असता संकेतस्थळावर प्रचंड अडचणी येत आहेत. एक अर्ज जमा करण्यास किमान दहा मिनीटे वेळ लागतो. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे संपूर्ण दिवसभरात किमान तीन ते चार अर्ज एक व्यक्ती भरू शकत आहे. त्यामुळे या सर्वांना पदवीधर मतदारांच्या नोंदणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
अनेक मतदार वंचित राहणार
विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर पदवी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून १ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ३ वर्षे पूर्ण झालेल्या पदवीधरांसह मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या सर्व पदवीधरांसाठी नव्याने मतदार नोंदणी करण्यात येत आहे. यासाठी विभागातील २५६ मतदान केंद्रांवर निवडणूक पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडे ही नोंदणीची सोय करण्यात आली आहे.
नुकतेच राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार ऑनलाईन पद्धतीने मतदार नोंदणीची व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, या संकेतस्थळावर नाेंदणी करताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नोंदणीमधील अडचणी दूर करून वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
