अमरावती : विदर्भातील प्रवाशांना पुणे येथे जाण्‍यासाठी ११ रेल्‍वेगाड्यांची सुविधा कागदावर दिसत असली, तरी त्‍यापैकी केवळ दोनच रेल्‍वे या दररोज धावणाऱ्या आहेत. नोकरी, व्‍यवसायाच्‍या निमित्ताने पुणे येथे स्‍थायिक झालेल्‍या नागरिकांना, शिक्षणासाठी गेलेल्‍या विद्यार्थ्‍यांना रेल्‍वेचे आरक्षणच मिळत नसल्‍याने त्‍यांना खासगी प्रवासी वाहनांशिवाय पर्याय नाही, हे वास्‍तव समोर आले आहे.

विदर्भातील हजारो कुटुंबे नोकरीच्या निमित्ताने पुण्‍यात स्‍थायिक झाली आहेत. अनेक विद्यार्थी पुणे येथे शिक्षण घेत आहेत. रोजगारासाठी अनेकजण स्‍थलांतरित झाले आहेत. त्‍यामुळे पुण्‍याशी विदर्भवासियांची नाळ जुळली आहे. परिणामी प्रवासीसंख्‍यादेखील वाढतच आहे. नागपूर, वर्धा, अमरावती येथून मोठ्या संख्‍येने खासगी बसेस पुणे येथे ये-जा करतात. उन्‍हाळी सुट्या, दिवाळी सण हे तर खासगी बसगाड्यांसाठी सुगीचे दिवस असतात. एसटी बसगाड्यांची सेवा उपलब्‍ध असली, तरी ती मर्यादित आहे. प्रवाशांची प्रथम पसंती ही रेल्‍वे आणि नंतर खासगी स्‍लिपर वाहनांना आहे. प्रवाशांची वाढती संख्‍या लक्षात घेता, दररोज धावणाऱ्या रेल्‍वेगाड्यांची संख्‍या वाढविल्‍यास मोठी सोय होणार आहे, पण त्‍याकडे रेल्‍वे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. बुलढाणा जिल्‍ह्यातील खासगी बसच्‍या भीषण दुर्घटनेनंतर पुणे येथे जाण्‍यासाठी दररोज धावणाऱ्या रेल्‍वेगाड्यांची संख्‍या वाढवावी, अशी मागणी पुढे आली आहे.

हेही वाचा – नागपूर : मेडिकल कर्मचारी संस्थेच्या निवडणुकीत सकाळी एक, संध्याकाळी दुसरा आदेश; कधी होणार निवडणूक? वाचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विदर्भातून पुणे येथे जाण्‍यासाठी महाराष्‍ट्र एक्‍स्‍प्रेस आणि आझाद हिंद एक्‍स्‍प्रेस या दोनच दररोज धावणाऱ्या रेल्‍वे उपलब्‍ध आहेत. गरीबरथ एक्‍स्‍प्रेस, नागपूर-पुणे सुपरफास्‍ट एक्‍स्‍प्रेस आठवड्यातून तीन दिवस, तर हटिया-पुणे एक्‍स्‍प्रेस आठवड्यातून दोन दिवस धावते. पुणे हमसफर, बिलासपूर-पुणे, अमरावती-पुणे एसी एक्‍स्‍प्रेस, अजनी-पुणे एसी एक्‍स्‍प्रेस, काझीपेठ-पुणे एक्‍स्‍प्रेस या गाड्या आठवड्यातून केवळ एकच दिवस उपलब्ध आहेत.