यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने आता कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १६ पंचायत समितींमध्ये ४८४ उमेदवारांना ८९ दिवसांचा शिक्षक होण्याची संधी मिळणार आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्हा खनिकर्म योजनेतंर्गत बाधित व अबाधित क्षेत्रातील शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांची ४१४ तर माध्यमिक शिक्षकांची ७० अशी एकूण ४८४ पदे भरण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात, कंत्राटी तत्त्वावर शिक्षक स्वयंसेवक भरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. २०२३-२४ या शैक्षणिक सत्रात ८९ दिवसांसाठी या कंत्राटी शिक्षण स्वयंसेवक नियुक्तीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी नुकतीच परवानगीही दिली आहे.
हेही वाचा >>> अपघात प्रवणस्थळी लोकसहभागातून मदत केंद्र, नागपुरातील उपक्रमाची काय आहे वैशिष्ट्ये?
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक अबाधित व प्रत्यक्ष बाधित शाळेत अपदवीधर २५४, पदवीधर विज्ञान-गणित ६३, भाषा ६९ समाजशास्त्र २८, माध्यमिक शाळेत शिक्षक १७, माध्यमिक शिक्षक २९, पदवीधर विषयक शिक्षक १६, अपदवीधर आठ अशी पदे रिक्त आहेत. शिक्षकांची पदेरिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची ओरड पालक वर्गातून होत आहे. त्यावर ही मात्रा शोधण्यात आली. शिक्षक स्वयंसेवकांची नेमणूक गट शिक्षणाधिकार्यांच्या संनियत्रणाखाली शाळा व्यवस्थापन समिती करणार आहे. निवड करण्यात आलेल्या शिक्षक स्वयंसेवकांना दरमहा सात हजार ५०० रुपये मानधन देण्यात येणार आहे. टीईटी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
अहर्ताप्राप्त उमेदवार उपलब्ध नसल्यास कला, वाणिज्य, विज्ञान पदवीधर उमेदवारांची गुणानुक्रमे निवड करण्यात येणार आहे. शिक्षक स्वयंसेवकांची नियुक्ती ही ८९ दिवसांचीच राहणार आहे. स्वयंसेवक शिक्षक हे जिल्हा परिषदेचे कर्मचारी राहणार नाही. त्यांना भविष्यात कोणत्याही पदावर दावा करता येणार नाही, असेही जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शैक्षणिक सत्र संपल्यावर तसेच रिक्तपद भरल्यास नियुक्ती रद्द करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारास त्याला देण्यात येणार्या तासिकेचा कालावधी सोडून इतर वेळेस खासगी व्यवसाय करण्यास हरकत राहणार नाही. मात्र, घड्याळी तासिकेवर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पंचायत समितीनिहाय रिक्त शिक्षकांची संख्या आर्णी तालुक्यात २४, बाभूळगाव १३, दारव्हा व दिग्रस प्रत्येकी २०, कळंब १६, महागाव ३१, घाटंजी २६, पुसद ४६, राळेगाव २६, उमरखेड ५७, नेर २०, पांढरकवडा १२, यवतमाळ २६, वणी ३०, मारेगाव १५, झरीजामणी ३१ याप्रमाणे अबाधित व प्रत्यक्ष बाधित शिक्षकांची ४१४ पदे रिक्त आहे. याशिवाय अत्यावश्यक माध्यमिक शाळेतील शिक्षकांची ७० पदेरिक्त आहेत.