लोकसत्ता टीम

चंद्रपूर: महाराष्ट्र सर्वच आघाड्यांवर क्रमांक एकचे राज्य होते. मात्र एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी राज्याची अवस्था चपराशासारखी केली आहे. राज्यात दोन अलिबाबा व अंशी चोरांचे सरकार आहे. भाजपने जनतेची कामे केली नाहीत म्हणूनच आता पक्ष फोडाफोडीचे काम करावे लागत आहे अशी टीका राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

जिल्हा काँग्रेस समितीचे वतीने आयोजित भव्य नागरी सत्कार सोहळ्यात वडेट्टीवार बोलत होते. मंचावर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, आमदार ॲड. अभिजित वंजारी, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, काँग्रेसचे माजी अध्यक्ष विनायक बांगडे, सुभाष गौर, शहर काँग्रेस अध्यक्ष रामु तिवारी, नंदू नागरकर, डॉ.रजनी हजारे, सुनीता लोडिया, चित्रा डांगे, चंदा वैरागडे, राजेश अडुर उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना वडेट्टीवार यांनी देशात २०२४ नंतर हुकूमशाही नको असेल तर काँग्रेस पक्षाला निवडून द्या व राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचे आवाहन केले.

आणखी वाचा-गडचिरोली : पोलीस बंदोबस्तात पं. दीनदयाळ अध्यासनाचे उद्घाटन; कार्यक्रम रद्द करण्यासाठी संघटनांचे भरपावसात आंदोलन

सहा दिवसापूर्वी प्रधानमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसने ७० हजार कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करतात आणि सातव्या दिवशी अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात, तेव्हा भ्रष्टाचाऱ्याना कोण पाठीशी घालत आहे याचा विचार जनतेने करावा. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केवळ राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी व मणिपूर मुद्यावरून लक्ष इतरत्र वळविण्यासाठी फ्लाईंग किसचा आरोप केला. नोकर भरतीच्या नावावर गरीब बेरोजगार युवकांची थट्टा चालविली असून परीक्षा घेणाऱ्या कंपनीला आर्थिक फायदा पोहचविण्याचे काम सुरू आहे. भाजपला राज्यात व देशात सत्तेसाठी इतर पक्षाचा टेकू हवा आहे, त्यामुळेच पक्ष फोडाफोडीचे राजकारण केले जात असल्याची टीका ही वडेट्टीवार यांनी केली.

राज्यात मंत्री पद मिळविण्यासाठी नौटंकी सुरू आहे, एक मंत्री म्हणतो बायको आत्महत्या करणार म्हणून मंत्री करा, दुसरा म्हणतो मला नारायण राणे संपवून टाकणार म्हणून मंत्री करा, आता तिसरा म्हणणार मला मंत्री बनवीत नाही तोवर म्हेस दूध देणार नाही असे म्हणत आहे. आता मला देखील मंत्री करा अशा शब्दात मंत्री पद मिळविण्यासाठी सुरू असलेल्या तमाशाची खिल्ली उडविली. राज्यातील गरीब जनता, शेतकरी उध्वस्त होत चालला आहे. शेतकऱ्यांना अजून दुष्काळी मदत मिळाली नाही. देशात ८० कोटी जनतेला धान्य वितरीत केल्याच्या दाव्याची पोलखोल करताना गडचिरोली जिल्ह्यातील गरीब जनतेला सडलेला, वास येणार गहू तांदूळ वाटप केल्याची टीका केली. राज्याची कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. एका वर्षात ७० हजार महिलांचे अपहरण झाले. त्यातील ८ हजार महिला अजूनही बेपत्ता आहेत. दररोज बलात्कार, अत्याचार, त्यांच्या घटना घडत आहेत. तेव्हा आता दक्ष रहा, अन्यथा तुम्ही गुलाम होणार. देशात कायदा बदलण्याची मोहीम राबविली जात आहे. २०२४ मध्ये सत्ता परिवर्तन केले नाही तर देशात हुकूमशाही लादल्या जाण्याची भीती वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

आणखी वाचा-मला मुख्यमंत्री बनवायला निघाले की फटाके बांधायला? आमदार वडेट्टीवार व धानोरकर यांच्या भर सभेत एकमेकांना कोपरखळ्या

या जिल्ह्यात काँग्रेसचा एक आमदार होता. आता पाच आमदार आहेत. काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी जीवाचे रान केले. २०१९ मध्येही खासदार बाळू धानोरकर यांची तिकीट आणताना काय काय केले हे आमदार धोटे यांना माहिती आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर येथून काँग्रेस खासदार विजयी होईल असेही ते म्हणाले. यावेळी उपस्थितांची भाषणे झाली. वडेट्टीवार यांचा विविध संघटनांचे वतीने नागरी सत्कार करण्यात आला. तर वडेट्टीवार यांचा हस्ते हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, बौध्द धर्म गुरूंचा सत्कार करण्यात आला. तसेच शहरात ठिकठिकाणी वडेट्टीवार यांची लाडू तुला, पुस्तक तुला, पुष्गुच्छ, हारानी स्वागत करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मला झोपू देणार नाहीत

मी सत्ताधाऱ्यांवर टीका करीत असल्याने सत्ताधारी मला स्वस्थ झोपी देणार नाहीत. मात्र मी कारागृहात जाण्यासाठी घाबरत नाही. मंत्री भुजबळ जिथे जावू आले तिथे मी देखील जावून आलो आहे. सत्ता एकाच पक्षाकडे टिकून राहत नाही. राज्यात आमची सत्ता आल्यानंतर आम्ही देखील दाखवू असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.