गडचिराेली : नोकर भरतीत पेसा कायद्याची अंमलबजावणी आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या आदिवासींप्रती होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात हजारो बेरोजगार आदिवासी युवक व युवतींना गडचिरोलीत गुरुवारी आक्रोश मोर्चा काढला. यावेळी जमलेल्या युवांनी भाजप खासदार अशोक नेते, आमदार कृष्ण गजबे आणि डॉ. देवराव होळी यांचा निषेध नोंदविला. तलाठी भरतीत पेसा कायद्यानुसार अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागा कमी करून त्या इतर प्रवर्गांना देण्यात आल्याचा आराेप करीत गुरुवारी हजारो आदिवासी युवक एकत्र आले. या निर्णयाचा इंदिरा गांधी चाैकात जाहीर निषेध केला.

जागा कमी करण्यासाठी आमदार डाॅ. देवराव हाेळी जबाबदार असल्याचा आराेप करीत त्यांच्याविराेधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बिगर पेसा अंतर्गतच्या जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवाव्यात, पेसा अंतर्गत जागा वगळून ओबीसी तसेच अनुसूचित जातीच्या युवकांसाठी स्वतंत्र जागा लोकसंख्येनुसार देण्यात याव्यात, बोगस आदिवासी लोकांनी आदिवासींच्या जागा बळकावल्या आहेत व अजूनही जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांना नोकरीतून बडतर्फ करावे आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल ऑडिओ, व्हिडिओमुळे आमदार होळींविरोधात रोष

या आंदोलनात आमदार डॉ.देवराव होळींविरोधात आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला. ओबीसींवर अन्याय झाल्याने तलाठी भरती स्थगित करा , अशी मागणी आमदार होळी यांनी केली होती. यावर एका आदिवासी युवकाने फोन करुन त्यांना जाब विचारला असता तुझ्या एका मताने निवडून येतो का, अशा शब्दांत त्यांनी त्यास सुनावल्याचा कथित ऑडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणाने उडालेला धुराळा जमिनीवर नीट टेकतही नाही तोच २४ जुलैला आमदार होळी यांनी विधिमंडळात गडचिरोलीला नक्षलग्रस्त, आदिवासी जिल्हा म्हणून सीएसआरचा दिला जाणारा अतिरिक्त ३० टक्के निधी बंद करावा, अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे गडचिरोलीचा विकास झाला, आता निधी नको, असेही त्यांनी म्हटले होते. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.