लोकसत्ता टीम
नागपूर : जम्मू- काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यंटकांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर पहलगाम खोऱ्यात दहशतीचे वातावरण आहे. आता लोक तिथे जायलाही घाबरत आहेत. देशातील इतर शहराप्रमाणे नागपुरातील पर्यटक तिकडे अडकले आहेत. एक पर्यटक जखमी झालेला आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरला पर्यटनाचे नियोजन असलेल्यांनी पर्यटन कंपनीकडे बुकिंग रद्द करण्याची विनंती केली आहे.
नागपुरातील केसरी टूर्स आणि विना वर्ल्डशी संपर्क साधले असता पर्यटकांनी बुकिंग रद्द करण्याची विनंती केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. परंतु कंपन्यांचे व्यवस्थापन काय निर्णय घेते, त्यावर सर्व अवलंबून आहे. कंपनीने स्थानिक हॉटेलची बुकिंग केली आहे. तसेच विमानांचे तिकीट खरेदी केले आहेत. अचानक बुकिंग रद्द केल्याने पर्यटकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सरकार याबाबत काय निर्णय घेते. याकडे कंपनीचे लक्ष आहे, असेही ते म्हणाले.
नागपूर शहरातून विविध टुर्स कंपन्यांच्या माध्यमातून वर्षभरात सुमारे दहा हजार पर्यटक जम्मू काश्मीरला जात असतात. एप्रिल ते जून कालावधीत सुमारे दीड हजार पर्यटक जम्मू-काश्मीर जातात. ८ मे रोजी नागपुरातून १२ पर्यटकांचे बुकिंग आहे, असेही ते म्हणाले.
नागपुरातून मुंबई मार्गे २२ एप्रिलला पर्यटकांची एक तुकडी श्रीनगरकडे रवाना होणार होती. परंतु पहलगामधील हल्ल्यानंतर मुंबईत पर्यटकांना थांबवण्यात आले आहे. यामध्ये नागपुराचे दहा पर्यटक आहेत. जम्मू-काश्मीरला केसरीची ८ मे रोजीची पर्यटकांची एक तुकडी पाठवण्याचे नियोजन आहे. या तुकडीतील बहुतांश पर्यटकांनी बुकिंग रद्द करण्याची विनंती केली आहे, असे केसरीच्या ( फ्रॅच्याजी) एका कर्मचाऱ्यांनी सांगितले.
मिनी स्वित्झर्लंड
पहलगाममध्ये जिथे हा हल्ला झाला त्या भागाला मिनी स्वित्झर्लंड असेही म्हटले जाते. जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्हा आणि त्याचा पहलगाम परिसर अनेकदा दहशतवाद्यांच्या लक्ष्यावर असतो. परंतु, यापूर्वी बैसरन खोऱ्यात कधीही दहशतवादी हल्ला झाला नव्हता. या भागात स्थानिक लोकांनंतर पर्यटक सर्वात सुरक्षित मानले जात होते. यामुळे येथे लष्कर किंवा पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले नव्हते. या परिस्थितीचा फायदा घेत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळ्या झाडल्या.
त्या स्थळावर वाहने जात नाही
जम्मू-काश्मीरमधील बैसरन खोऱ्यात पर्यटकांना पायी जावे लागते. तेथपर्यंत कोणतेही वाहन जात नाही. त्यामुळे त्या स्थळावर आम्ही पर्यटकांना घेऊन जात नाही. आम्ही जे स्थळ दाखवतो, ते बैरसन खोऱ्यापासून ४० किलोमीटर आहे, असे विना वर्ल्डच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.