Kashmir Terror Attack UBT Shivsena Protest: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या भ्याड हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वतीने बुलढाणा येथे काळ्या फित लावून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आल्या.
बुलढाणा शहराच्या संगम चौकातील शिव स्मारक समोर आज गुरुवारी, २४ एप्रिल रोजी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या नेत्यांनी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथील अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध केला. तसेच या प्रकरणी केंद्र सरकारने कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
निषेध आंदोलनात शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके, जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हाप्रमुख वसंत भोजने, जिल्हा समन्वयक संदीप शेळके, जिल्हा संघटक दत्तात्रय लहाने, बुलडाणा तालुकाप्रमुख लखन गाडेकर, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद सोफियान यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी अतिरेकी हल्ल्याचा निषेध नोंदविला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पंतप्रधान व केंद्र सरकारने कठोर कारवाई करणे काळाची गरज ठरली आहे. मेहकर विधानसभा मतदार संघांचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी हल्ल्याचा निषेध केला व अतिरेकी व त्यांना पोसणाऱ्या देशाला केंद्र सरकारकडे जशास तसे उत्तर देण्याची मागणी केली. सरकारने “त्यांच्या घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला पाहिजे” अशी संतप्त भावना खरात यांनी बोलून दाखविली.
दहशतवाद्यांच्या या कृत्यामुळे देशाच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता केंद्र सरकारने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे शिवसेना कार्यकर्त्यांनी सांगितले. बुलडाणा जिल्ह्यातील विविध भागांतूनही या हल्ल्याचा निषेध नोंदवला जात आहे.