नागपूर : एकीकडे राज्य शासनाकडून सर्वसामान्य लोकांसाठी ‘सरकार आपल्या दारी’ ही योजना राबवली जात असली तरी प्रत्यक्षात विविध प्रमाणपत्रांसाठी पालकांची भटकंती मात्र थांबली नाही. शहराच्या विविध सेतू केंद्रात यासाठी केलेले अर्ज महिन्याभरापासून प्रलंबित असल्याच्या तक्रारी पालकांकडून केल्या जात आहेत.
शाळा, महाविद्यालयात उत्पन्नाच्या प्रमाणपत्रासह इतरही प्रमाणपत्रांची गरज विद्यार्थ्यांना भासते. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने विविध ठिकाणी खासगी सेतू केंद्र सुरू केले आहे. अर्ज केल्यावर कमीत कमी १५ दिवसांत आवश्यक कागदपत्रे असेल तर प्रमाणपत्र दिले जाईल, असे सांगण्यात आले. मात्र, पालकांनी अर्ज केल्यानंतर एक महिना झाला तरीही प्रमाणपत्र प्रलंबित असल्याचे ऑनलाईन प्रक्रियेत दर्शवले जात आहे. एकीकडे शाळा, महाविद्यालये प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्याच्या मागे लागते तर दुसरीकडे पालक सेतू केंद्रावर गेल्यावर त्यांना प्रमाणपत्र जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित असल्याचे सांगण्यात येते.
हेही वाचा – वाशीम जिल्हावासीयांसाठी महत्वाची बातमी, कामरगाव व अनसिंग तालुका निर्मिती….
हेही वाचा – नागपूर : महामेट्रोचा जाहिरातींवर तीन कोटींहून अधिकचा खर्च
जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यावर अधिकारी जागेवर नसतात, त्यामुळे पालकांना सारखी पायपीट करावी लागते. एका पालकाने २७ जुलैला सेतू केंद्रातून ऑनलाईन अर्ज केला होता. वारंवार पाठपुरावा केल्यावर त्याला एक महिन्याने प्रमाणपत्र मिळाले. महापालिकेच्या विभागीय सेतू केंद्रातून त्यांनी अर्ज केला होता. प्रलंबित प्रकरणांबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
