भंडारा: राज्यात महिला अत्याचाराच्या आणि गुन्ह्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असताना आता भंडारा जिल्ह्यात मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या आई वडिलांनीच पैशांसाठी असं काही केलं की वाचून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.

बारावीत शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय पोटच्या पोरीला जन्मदात्या आई-वडिलांनीच पैशांसाठी विकून विविध व्यक्तींकडून सामूहिक अत्याचार करायला भाग पाडले. ही धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत घडली. पीडितेच्या काकूने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर हा घृणास्पद आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

साकोली तालुक्यातील वडद गावात हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पीडिता साकोली येथील एका महाविद्यालयात बारावीत शिक्षण घेत आहे. गावावरून रोज ये-जा करण्यासाठी त्रास होत असल्याने ती साकोली येथील काकाकडे राहून शिक्षण घेत होती. कालांतराने पीडितेच्या वडिलांनी तिला गावाला बोलावून घेतले. बऱ्याच दिवसांपासून पीडितेसोबत बोलणे झाले नसल्याने काकाने १४ डिसेंबर रोजी फोन करून तिच्या प्रकृतीची आणि कुटुंबियांची विचारपूस केली. त्यावेळी पीडीतेने आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार काकु जवळ कथन केला. पीडितेच्या काकूने पुढाकार घेत साकोली पोलिस ठाण्यात याची तक्रार नोंदवली. पैशांसाठी पोटच्या मुलीला आई आणि वडिलांनीच ओळखीतील काही इसमांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी बळजबरी केल्याचे पीडित मुलीकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा… गोंदियात ख्रिसमसचा उत्साह; खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी, चर्चमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई

गेल्या महिन्याभरामध्ये तिच्यावर कधी एकांतात तर कधी सामूहिकरित्या अत्याचार करण्यात आले. कधी तिच्या गावातील घरीच आई-वडिलांच्या समक्ष, कधी साकोली तर कधी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिला मारहाण करत अत्याचार करण्यात आले आहेत.

या प्रकरणी तक्रार दाखल होताच साकोली पोलिसांनी संबंधित मुलीच्या आई-वडिलांसह सहा जणांना अटक केली. यातील एक आरोपी फरार असून त्याचा पोलीस शोध घेत असल्याचे भंडारा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी सांगितले.

पीडित मुलीचे वडील संजय (५०) , आई मीनाक्षी (४०), बादल महेन्द्र सुखदेवे (३२) रा. सराटी ता. साकोली, विनोद रामदास चरडे (४५) रा. नागपुर ह.मु. व्दारका नगर तिलकसिंग वार्ड गोंदिया जि. गोंदिया, पप्पु भगवान फुल्लुके (४२) आणि वैशाली मनसाराम लंजे (३०) दोघेही रा. तलाव वार्ड, साकोली असे अटक करण्यात आलेल्या सहा जणांचे नाव आहे. तर, अविनाश बांते या फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचा… शेतमाल खरेदीत हिंगणघाट बाजार समिती अव्वल, तब्बल ११ लाख क्विंटलची खरेदी

ग्रामीण भागात घडलेल्या या प्रकारामुळे भंडारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पैशांच्या मोहापायी जन्मदात्या आई-वडिलांनीच पोटच्या मुलीला देहव्यवसायात ढकलल्याने सामाजिक स्तरावर मोठा संताप व्यक्त होत आहे. या घटनेबाबत साकोली पोलिसांनी पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांना कळवतात त्यांनी संवेदनशीलता दाखवत तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पीडित मुलीला आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी साकोली पोलिसांना दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहोत. हा प्रकार प्रचंड धक्कादायक असून यात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा शोध घेतला जात आहे’, अशी माहिती पोलिस अधीक्षक मतानी यांनी दिली. सध्या पीडित मुलगी ही प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. तिला गरज भासल्यास आवश्यक समुपदेशनाची मदत केली जाईल, असेही मतानी यांनी या घटनेबाबत माहिती देताना स्पष्ट केले.