नागपूरः भाजपा आणि काँग्रेस पक्षातील गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे नेते सध्या वेगवेगळ्या मुद्यांवरून एकमेकांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाही. अशातच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजपा नेते आशिष शेलार विधिमंडळ परिसरात अमोरासमोर आले. दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठही उपस्थित होते. पटोले, शेलार आणि शिरसाठ यांच्यात काय चर्चा झाली, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनात विरोधक विविध मुद्यांवरून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे, तर सत्ताधारी विरोधकांचा मारा परतवून लावत आहे. अशातच पटोले, शेलार आणि शिरसाठ यांची भेट चर्चेचा विषय ठरली आहे. पटोले आणि शेलार यांनी या भेटीतही एकमेकांवर शाब्दिक टोलेबाजी केली.

हेही वाचा… “अहो भुजबळ, संवैधानिक पद आहे तर भाषणे सोडा अन् लोकांची कामे करा, नाही तर…” कोण देतोय असा सल्ला?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पटोले आणि शेलार या दोन्ही नेत्यांनी गुरुवारी खादीचे कपडे घातले होते. दोघांनी हस्तांदोलन करत प्रथम एकमेकांच्या कपड्यांची प्रशंसा केली. त्यानंतर पत्रकारांचे दोघांकडे लक्ष गेल्यावर दोघांनी एकमेकांना टोले हाणले. प्रथम शेलार गमतीने म्हणाले, काँग्रेसने दुर्लक्षीत केल्याने खादी आणि स्वदेशीचा मुद्दा आता भाजपने प्राधान्याने घेतला आहे. त्यावर पटोले म्हणाले, खादी म्हणजे खाने दो असा भाजपचा मंत्र आहे. त्यावर शेलार यांनीही खाने दो ही काँग्रेस नेत्यांची शैली असल्याचे सांगितले. दोघांमध्ये टोलेबाजी सुरू असताना तेथे शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाठ उभे होते. त्यांनी मात्र दोघांच्या मधात बोलणे टाळले.