अकोला : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार जमीन प्रकरणात अडचणीत सापडल्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याची एक पोस्ट समाजमाध्यमावर प्रसारित झाली. त्याचा धागा पकडून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मिटकरींवर टीकेचे बाण सोडले. अमोल मिटकरींच्या वक्तव्याची ती पोस्टच फेक असल्याचे नंतर समोर आले. दरम्यान, मिटकरी यांनी दमानियांना प्रत्युत्तर देऊन ‘अर्धवट ज्ञानाचा आता कंटाळा आलाय, याला आगीत तेल टाकणे, असे म्हणतात. जे तुम्ही प्रामाणिकपणे करता.’ असा जोरदार टोला लगावला.
पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा गंभीर विषय असून सर्व दोषींवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सारवासारव केली जात आहे. त्यातच आज सकाळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विधानासह त्यांच्या छायाचित्राची एक पोस्ट समाज माध्यमावर प्रसारित झाली. त्यामध्ये ‘पार्थला काही झालं तर राज्य सरकार कोसळलं म्हणून समजा. पार्थ प्रमाणे भाजपने केलेले घोटाळे सुद्धा बाहेर काढणार!’ असा उल्लेख त्या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. ही पोस्ट फेक असल्याचे स्पष्टीकरण आमदार अमोल मिटकरी यांनी दिले. भाजप नेते आशिष शेलार यांच्या बाबतीत सुद्धा या प्रमारे फेक पोस्ट करण्यात आली. खोडसाळपणे कोणी तरी विरोधकाने हे कृत्य केले असावे, असे अमोल मिटकरी म्हणाले.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंमली दमानिया यांनी अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याची हीच फेक पोस्ट शेयर करीत ‘धमकी? म्हणजे घोटाळे करायचे आणि तुमच्यावर कारवाई नाही करायची? वाह रे वाह’ अशी टीका केली. त्याला अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘एक्स’ खात्यावर पोस्ट टाकत अमोल मिटकरींनी अंजली दमानिया यांना खडेबोल सुनावले.
मिटकरी म्हणाले, ‘जरा पूर्ण माहिती घेऊन व्यक्त होत जा मॅडम. तुमच्या अर्धवट ज्ञानाचा आता कंटाळा आलाय. याला आगीत तेल टाकणे असे म्हणतात, जे तुम्ही प्रामाणिकपणे करता.’ पार्थ पवार जमीन प्रकरण आणि फेक पोस्ट यावरून अमोल मिटकरी व अंजली दमानिया यांच्यात चांगलीच जुंपल्याचे चित्र दिसून येत आहे.
