बुलढाणा : जिल्ह्याचे प्रशासकीय आरोग्य यंत्रणाचे देखील मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरातून अतिशय धक्कादायक आणि तितकीच चीड आणणारी ही बातमी आहे. बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारसाठी भरती असलेल्या एका रुग्णाने आत्महत्या केली आहे. आज शुक्रवारी भरदिवसा घडलेल्या या खळबळजनक घटनेने जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांची सुरक्षितता आणि याच बरोबर जिल्हा रुग्णालय प्रशासनचा गाफिलपणा देखील ऐरणीवर आला आहे.

आज शुक्रवारी ,२३ मे रोजी संध्याकाळी घडलेल्या या घटनेने जिल्हा रुग्णालय प्रशासन हादरले असून आरोग्य यंत्रणासह बुलढाणा शहरात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील लाखो गोरगरीब सर्वसामान्य रुग्णांसाठी आधार असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाची सुरक्षितता वाऱ्यावर आहे का? असा सवाल या दुर्दैवी आणि तितक्याचं धक्कादायक घटना क्रमामुळे उपस्थित झाला आहे.

विजय गोविंद इंगळे ( वय ३८, राहणार सागवान, तालुका बुलढाणा, जिल्हा बुलढाणा) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार विजय इंगळे यांना व्यसन होते. त्यात त्यांची तब्येत खालावल्याने मागील सोमवारी, १९ मे रोजी इंगळे यांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले होते.

अनेक विभागात आणि लहान मोठया इमारतीत विभागलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील वार्डात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. दरम्यान आज २३ मे रोजी रुग्णालयात पहिल्या मजल्यावर त्यांनी केबलच्या सहाय्याने गळफास घेतला. ही धक्कादायक बाब निदर्शनास येताच सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. महिलांची आरडा ओरड, वार्डात नियुक्त परिचारिका, कर्मचारी, वार्ड बॉय यांची धावपळ यामुळे वार्डातच नव्हे पहिल्या माळ्यावरील भागात एकच आकांत उसळला. याची माहिती मिळताच वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी धावत वर आले. या धावपळीत जिल्हा रुग्णालय कर्मचाऱ्यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्याला याची माहिती दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली . त्यांनी पहिल्या मजल्यावरील वार्डाची व इंगळे यांच्या जागेची पाहणी करून पंचनामा केला. या भीषण घटनेमुळे घटनेच्या वेळी वॉर्डातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी काय करत होते? असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.