पटवर्धन शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. मंजूषा सावरकर यांचे आवाहन; ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : अलीकडच्या काही वर्षांमध्ये मराठी शाळांना घरघर लागली आहे. नागपूर शहरातील ५४ शाळा बंद झाल्या आहेत. काही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, यासाठी सर्व सुज्ञ मराठीजनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. मंजूषा सावरकर यांनी केले आहे. ‘लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत त्यांनी शहरातील पटवर्धन शाळा आणि एकूणच मराठी माध्यमांच्या शाळांविषयी कळकळ व्यक्त केली.

त्या म्हणाल्या, १०० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचे शासनाचे धोरण आहे. या धोरणानुसार शहरातील ५४ मराठी शाळा बंद झाल्या आहेत. मराठी शाळा टिकल्या पाहिजेत म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ प्रयत्न करीत आहे. इतर काही मंडळीही न्यायालयात गेली आहेत. या शहरातून देशाला अनेक नामवंत देणारी व शतकी प्रवास पूर्ण केलेली सीताबर्डीतील पटवर्धन शाळेकडेही विद्यार्थ्यांचा ओघ कमी झाला आहे. एकेकाळी या शाळेत प्रवेश घेण्यासाठी चढाओढ लागत असे.

अनेक मोठी माणसे या शाळेत शिकली आणि त्यांनी त्यांनी नावलौकिक मिळवला. यामध्ये उद्योग क्षेत्रातील विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष धनराज आचार्य, राजलक्ष्मी कोल्ड स्टोअरेजचे संस्थापक सुधीर चिटणवीस, गाजलेल्या खेळाडूंमधील रा.ना. वझलवार आणि प्र.वि. सोनी, उद्यम मासिकाचे संपादक वि.ना. वाडेगावकर तसेच सिने व्यावसायिक सा.बा. पाटील, मुख्य न्यायाधीश पी.व्ही. दीक्षित, राज्य शासनातील कृषी संचालक डॉ. के.जी. जोशी, मुंबई कॅन्सर रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. सहस्रबुद्धे, माजी खासदार बाळकृष्ण वासनिक  आणि राजकारणातील सर्वपरिचित असे नाव म्हणजे भाई बर्धन यांचा समावेश आहे. पटवर्धन शाळेत विद्यार्थ्यांच्या र्सवकष विकासावर विशेष लक्ष दिले जाते. मराठी शाळेतून शिकणारा विद्यार्थी व्यावसायिक स्पध्रेत मागे पडू नये, यासाठी विद्यार्थ्यांना सेमीइंग्रजी शिक्षणाबरोबरच तांत्रिक शिक्षण देणारी ही शाळा आहे. येथे आठवीपासूनच  हे तांत्रिक शिक्षण दिले जाते. अ‍ॅटोमोबाईल, लोहारी, सुतारी, विजेरी कामे शिकवली जातात. त्यामुळे शासकीय तंत्रनिकेतन किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयात बी.ई. शिक्षणासाठी पटवर्धन शाळेच्या विद्यार्थ्यांना २५ टक्के आरक्षण मिळते. शाळेने शाळाबाह्य़ मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न चालवले आहेत, अशी माहितीही डॉ. सावरकर यांनी दिली.

शाळेचे ब्रीद ‘तेजस्विनावधीतमस्तु’

रावबहादूर राजाराम सीताराम दीक्षित, बापूराव पटवर्धन आणि भार्गव गाडगीळ यांनी १८८५मध्ये पटवर्धन शाळा स्थापन केली. त्यावेळी शाळेचे नाव शासकीय बहुउद्देशीय पटवर्धन उच्च माध्यमिक विद्यालय होते. १९१०मध्ये ती शासनाच्या नियंत्रणाखाली आली. शाळेचे ब्रीद ‘तेजस्विनावधीतमस्तु’असे आहे. त्याचा अर्थ शिक्षक शिकवत नसतो तर शिकत असतो. विद्यार्थी आणि शिक्षक एका पातळीवर असतात आणि अध्यापनाने त्यांची वाटचाल तेजस्वीतेकडे होत असते, याकडेही सावरकर यांनी लक्ष वेधले.

स्कूलबससाठी समाजाला आवाहन करणार

गरजू, दुर्बल, वंचित, बहुजन वर्गातील मुलांनी शाळेत प्रवेश घ्यावा. मातृभाषेतून शिकण्याने फायदेच होतात. प्रमाणभाषा आणि बोलीभाषा हा न्यूनगंड काढून टाकावा. वाडी, हिंगणा, मानकापूर अशा कितीतरी लांबच्या वस्त्यांमधून मुले येतात. शहराच्या मध्यवर्ती भागात ही शाळा आहे. शाळेच्या मुलांसाठी स्कूलबसची सोय व्हावी, असे मनापासून वाटते. त्यासाठी शिक्षणाची जाण असलेल्या सीताबर्डी भागातील व्यापारी, देश-विदेशातील शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना भेटून स्कूलबससाठी आवाहन करणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patwardhan school headmaster dr manjusha sawarkar visit loksatta office in nagpur
First published on: 04-08-2018 at 03:39 IST