नागपूर : राज्यातील थांबलेली पर्यटनाची चाके येत्या एक ऑक्टोबरपासून पुन्हा धावू लागणार आहेत. त्यादृष्टीने व्याघ्रप्रकल्प, अभयारण्यांनी तयारी देखील सुरू केली आहे. पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी सुरू झालेली आहे. मात्र, महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पातील पर्यटन रस्त्यांची अवस्था फारच बिकट झाली आहे. परिणामी एक ऑक्टोबरचा मुहूर्त या व्याघ्रप्रकल्पाला चुकवावा लागणार आहे. दरम्यान, १५ ऑक्टोबरपासून मात्र पेंच व्याघ्रप्रकल्पातील नियमित पर्यटनाला सुरुवात होऊ शकते.

राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भात गेल्या काही दिवसात पावसाचा जोर वाढला आहे. या मुसळधार पावसामुळे पेंच व्याघ्रप्रकल्पातील पर्यटनाचे रस्ते अतिशय खराब झाले आहेत. या रस्त्यावरुन पर्यटन वाहने फसण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळेच एक ऑक्टोबरपासून सुरू होणारे या व्याघ्रप्रकल्पातील पर्यटन यावर्षी १५ दिवस उशीराने सुरू होणार आहे. पेंच व्याघ्रप्रकल्प व्यवस्थापनाने या व्याघ्रप्रकल्पातील पर्यटन रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात केली आहे. युद्धपातळीवर हे काम सुरू असले तरीही रस्ते अधिकच खराब झाल्याने वेळ लागत आहे. पर्यटकांच्या जीवाला कोणताही धोका होऊ नये त्यामुळे रस्ते पुर्णपणे दुरुस्त झाल्याशिवाय पर्यटन सुरू न करण्याचा निर्णय पेंच व्यवस्थापनाने घेतला आहे.

दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक या व्याघ्रप्रकल्पात येतात. व्याघ्रदर्शन झाले नाही तरीही पेंचचे जंगल अतिशय सम़द्ध आहे. त्यामुळे देशविदेशातून पर्यटक येतात. यावर्षी पावसाचा जोर अजूनही कायम आहे. पर्यटनाच्या अनेक मार्गातील रस्ते चिखलमय होऊन उखडले आहेत. बऱ्याच ठिकाणी मोठमोठे खड्डेही पडले आहेत. अशा रस्त्यावर वाहने फसण्याचीच अधिक शक्यता आहे. विशेषतः बखारी, भिवसेन कुटी, सलामा–बखारी आणि फेफडीकुंड या मार्गावरील रस्त्यांची सर्वाधिक दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती आवश्‍यक असल्याने प्रकल्प प्रशासनाने ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात डागडुजीचे काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पेंच व्याघ्रप्रकल्प निसर्ग निरीक्षण व वन्यजीव अभ्यासासाठी अधिक प्रसिद्ध आहे. वाघ दिसला नाही तरी पर्यटक निराश होत नाही, कारण पावसाळ्यानंतर हिरवाईने नटलेले जंगल पाहणे ही पर्यटकांसाठी खास पर्वणी आहे. पर्यटन सुरू होण्यास काही दिवस वाट पहावी लागत असली तरी १५ ऑक्टोबरपासून सुरक्षित व आनंददायी जंगल सफारीचा अनुभव घेता येणार आहे. त्यामुळे यावर्षी पहिल्यांदाच पेंच व्याघ्रप्रकल्पात पर्यटनासाठी पर्यटकांना वाट पहावी लागणार आहे. एक ऑक्टोबरऐवजी हे जंगल १५ ऑक्टोबरला पर्यटकांसाठी खुले होणार आहे.