भंडारा : ” आमच्या सरपंच बाई आणि इतर महिलांना रात्रीच्या वेळीच भलते सलते उद्योग सुचतात, उठ सुठ झाडूच लावायचा, कचरा साफ करायचा, रात्री मीटिंग काय घ्यायच्या, नको ते सोंग करायचे’ अशा बोचऱ्या टीका माझ्यावर केल्या जात होत्या. पण कुणालाही प्रतिउत्तर न देता मी माझे काम सुरू ठेवले. मात्र माझ्या कामावर हसणारे आणि मला मुर्खात काढणारे लोकं आज माझ्यावर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत आणि बेला ग्रामपंचायतीला सलाम ठोकत आहेत.

नुकताच राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते भंडाऱ्यातील बेला ग्राम पंचायतीला कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कार प्रदान करण्यात आला. या बेला ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच शारदा गायधने यांची ही यशोगाथा. बेला ग्रामपंचायतीत एकूण १४ सदस्य असून त्यात महिला सरपंचासह तब्बल ८ महिला सदस्य आहेत. या १४ ही सदस्यांच्या चमूने रात्रीचा दिवस करून गावाचा कायापालट केला. मागास अशी ओळख असलेल्या जिल्ह्यातील या ग्रामपंचायतीने आता थेट राष्ट्रीय पुरस्कारावर मजल मारली असून देश पातळीवर गावाचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. नुकताच ११ डिसेंबरला बेला ग्रामपंचायतीला कार्बन न्युट्रल थीममध्ये देशातला पहिल्या क्रमांकाचा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मिळाला आहे. कार्बन न्युट्रल करण्यासाठी महिला सरपंचांनी गावात काय महत्वपूर्ण बदल केले? गावात कोणकोणत्या उपाययोजना राबवल्या की त्याची दखल थेट राष्ट्रीय पंचायत पुरस्कारासाठी घेतली गेली? याबाबत जाणून घेण्यासाठी सरपंच शारदा गायधने यांच्याशी ‘लोकसत्ता’ने संवाद साधला.

हेही वाचा…नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघिणीच्या छाव्यांचा खेळ

बेला हे साधारण दहा ते बारा हजार लोकसंख्येचे गाव. गावात २७०० कुटुंब आहेत. गावात प्रवेश करताच रस्त्याच्या दुतर्फा आणि घरांसमोरही हिरवी झाडे दिसतात. ग्रामपंचायत सुध्दा चहूबाजूंनी झाडांनी वेढलेली आहे. ज्याला त्या झाडाचे पालकत्व दिले त्याचे नाव त्या झाडावर लिहिलेले दिसते. या ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत शारदा गायधने. शारदा या २०१२ ते २०१७ या काळातही सरपंच होत्या. त्या काळातही त्यांनी वृक्षरोपणाचा अनोखा उपक्रम राबवून गावात हरितक्रांती घडविली होती. त्यासाठी त्यावेळी त्यांना स्मार्ट ग्राम आणि संत गाडगेबाबा असे ६० लाख रुपयांचे दोन पुरस्कार मिळाले होते.

२०२२ मध्ये शारदा गायधने या एकट्याच नाही तर महिलांचं पॅनल घेऊनच निवडून आल्या. महिनाभरापूर्वीच त्यांना राज्यातील ‘माझी वसुंधरा’ चे सव्वा कोटी रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. याशिवाय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कारात त्यांचा जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक आला.

शारदा गायधने सांगतात की, “सरकारकडून मिळणारा निधी, ग्रामपंचायतीचा स्वनिधी यावर गावाचा विकास होऊ शकणार नाही हे माहिती आहे. मग गावाचा विकास करायचा असेल तर निधी कुठून मिळेल? तर त्यासाठी एकमेवर पर्याय होता तो म्हणजे स्पर्धा.” “मग गावासाठी कोणकोणत्या स्पर्धा आहेत त्याचा आम्ही अभ्यास केला. माझी वसुंधरा अभियानात सहभागी झालो. त्याचे निकष वाचले. त्या निकषानुसार काम केले. पण, मागील वेळी आम्हाला हा पुरस्कार मिळू शकला नव्हता.” गाव शहरालगत आणि महामार्गावर असल्याने हवेत प्रदूषण होते. हे कमी करण्यासाठी आम्ही कार्बन न्युट्रल समिती तयार केली. त्या माध्यमातून जनजागृती केली आणि पाच घटकांवर काम केले.

हेही वाचा…शिक्षकांसाठी मोठी बातमी! वेतनात २० टक्के वाढ होणार?

१. वृक्षारोपण

शारदा गायधने यांनी वृक्षारोपणाला महत्व दिले. गावातील मोकळ्या जागेत हजारो झाडे लावली. तलावाच्या रस्त्यावर, पाणीपुरवठा योजना असलेल्या मोकळ्या जागेत, शाळा, ग्रामपंचायत, तसेच खासगी पडीत असलेल्या भूखंडावर देखील संबंधित मालकासोबत ठराव करून त्यांनी तिथेही वृक्षलागवड केलेली आहे. तसेच लोकांच्या घरासमोर झाडे लावून त्या झाडांचे पालकत्व त्यांनाच देण्यात आले आहे. शारदा सांगतात, आतापर्यंत जवळपास ९० हजार झाडे लावली आहेत. देशी जाती, विदेशी जाती, नर्सरी, अधिक ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड केली. प्रदूषण कमी व्हायला मदत झाली.

२) प्लास्टिक बंदीचा ठराव…

हवेतले प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रामपंचायतीने प्लास्टीक बंदीचा ठराव घेतला. कापडी पिशव्या शिवण्याचं काम गावातीलच बचत गटाला दिलं आणि त्या पिशव्या लोकांना तसेच सुपर मार्केटमध्ये देण्यात आल्या. शारदा म्हणतात, प्लास्टिकचा वापर खूप कमी झाला. त्यामुळे प्लास्टिक जाळल्याने जे प्रदूषण होत होते ते कमी झाले.

३) ई-व्हेईकल वापरण्यावर भर

पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांमुळे हवेचे प्रदूषण होते. आम्ही ईलेक्ट्रीक व्हेईकल आणल्या. त्यासाठी ग्रामपंचायतीत चार्जिंग स्टेशनही तयार केले. लोकांना पेट्रोलची किती बचत होते, ईलेक्ट्रिक वाहन किती परवडते हे आम्ही प्रात्यक्षिक करून दाखवून दिलं. त्यामुळे काही लोकांना पटलं आणि ती लोक ईलेक्ट्रिक व्हेईकलकडे वळली. आता गावात जवळपास २०० लोक ईलेक्ट्रिक व्हेईकल वापरतात, असे शारदा सांगतात.

४) घनकचरा व्यवस्थापन

गावात ओला कचरा-सुखा कचरा याबद्दल लोकांमध्ये अधिक जनजागृती करण्याची गरज होती.त्यामुळे दोन वर्षांपूर्वी संक्रातीत वाण म्हणून ग्रामपंचायतीकडून डस्टबीन वाटप करण्यात आले.

५) पारंपरिक वीज बचत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या गावात सर्व शासकीय इमारतींवर सोलरचे पॅनल लागलेले आहेत. ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, अभ्यासिका अशा सगळ्या इमरती या सोलरवर चालतात.