नागपूर : “पेटा” या प्राणी हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थेने कोल्हापूर जिल्ह्याजवळील कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील तीन मठांना नोटीस पाठवल्याची चर्चा आहे. या नोटिशीमध्ये पेटाने या मठांमध्ये असलेल्या हत्तींची काळजी कशी घेतली जाते, त्यांच्या आरोग्याच्या समस्या आणि इतर गरजांची माहिती मागवली आहे. कोल्हापुरातील “महादेवी” हत्तीणबाबत “पेटा” ने अचानक येऊन तिची तपासणी केली आणि य हत्तीण बाबत हेळसांड होत असल्याचा अहवाल दिला. तर आता हत्ती असलेल्या आणखी तीन मठांना नोटीस दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे “पेटा” हत्तीबाबत आत्ताच अचानक कशी काय तपासणी करत आहे? “पेटा” ला आत्ताच अचानक जाग का आली? “पेटा” च्या या भूमिकेचा आणि “वनतारा” चा काही संबंध तर नाही ना? असे अनेक प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत.

तर “पेटा” च्या या भूमिकेबद्दल अनेकांनी संशय देखील व्यक्त केला आहे. रोखठोक मत व्यक्त करणारे अभिनेते किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर दोन दिवसांपूर्वी याबाबत मत व्यक्त केले होते. “कोल्हापुरातील “महादेवी” हत्तीण नंतर तीन मठांच्या हत्तींवर संक्रांत आहे. कर्नाटकातल्या शेडबाळ, अकलनूर आणि बिचले इथल्या मठांना त्यांच्या हत्तींच्या आरोग्याची हेळसांड होत असल्याची नोटिस गेली आहे”, असे अभिनेता किरण माने म्हणाले होते. दरम्यान, एका मराठी वृत्तवाहिणीवर याबाबतचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर माने यांच्या या पोस्ट ला दुजोरा मिळाला आहे. “पेटा” च्या या भूमिकेनंतर हत्तींच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या इतर संस्था आणि व्यक्तींमध्ये सुद्धा याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. पेटाने मठांना हत्तींच्या सद्यस्थितीबद्दल तपशीलवार अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या अहवालात हत्तींना मिळणारे अन्न, पाणी, वैद्यकीय सुविधा आणि त्यांच्या निवाऱ्याची स्थिती याबद्दल माहिती मागविण्यात आली आहे. बेळगावमधील या मठांमधील हत्तींच्या स्थितीवर आता अधिक बारकाईने लक्ष ठेवले जाईल. दरम्यान, “पेटा” ला सोशल मीडियावर सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

“पेटा” या संस्थेबद्दल…

“पेटा” चे पूर्ण नाव “पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स” आहे, ही प्राणी हक्क संघटना आहे. तिचे मुख्यालय अमेरिकेतील व्हर्जिनियामधील नॉरफोक येथे आहे. “पेटा” चे मुख्य उद्दिष्ट प्राण्यांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि त्यांच्यावरील अत्याचार रोखणे आहे. “पेटा” भारतात देखील सक्रिय आहे आणि त्याला “पेटा इंडिया” असे म्हणतात. “पेटा इंडिया” चे मुख्य कार्यालय मुंबईत आहे. प्राण्यांवरील क्रूरतेविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी काम करते.