यवतमाळ – राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज सोमवारी यवतमाळ येथील श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांनी कामबंद आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे सकाळपासूनच रुग्णालयातील वैद्यकीय सेवा विस्कळीत झाल्या असून, उपचारासाठी आलेल्या रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सर्व शिकाऊ डॉक्टर, निवासी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी एकत्र येत ही भूमिका घेतल्याने रुग्णालय प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले. ओपीडीपासून वार्डपर्यंत सेवा ठप्प झाल्याने अनेक रुग्णांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागली. काही गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयांकडे वळावे लागल्याची माहिती मिळाली आहे.
डॉ. संपदा मुंडे फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याने संपूर्ण राज्यातील वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. त्यांच्या आत्महत्येमागील कारणे अजूनही स्पष्ट नसली तरी, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झालेल्या मानसिक छळाचा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. या घटनेनंतर वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये आणि डॉक्टरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
यवतमाळसह राज्यातील अनेक ठिकाणी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला आहे. डॉक्टर संघटनांनी दोषी पोलीस अधिकाऱ्यांसह संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. दरम्यान, या घटनेवर राज्यभरात तीव्र चर्चा सुरू आहे. वैद्यकीय शिक्षणातील ताण, कामाच्या ठिकाणी होणारा मानसिक दबाव, वरिष्ठांचा गैरवर्तनाचा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे. डॉक्टर समुदायाने शासनाकडे अधिक सुरक्षित आणि संवेदनशील कार्यपरिसराची मागणी केली आहे.
यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय प्रशासनाने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असला, तरी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या एकमुखी आंदोलनामुळे सेवा पूर्ववत होण्यासाठी अजून वेळ लागणार असल्याचे सांगण्यात आले. समाजातील सर्व स्तरांतून डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यूनंतर तीव्र संताप व्यक्त होत असून, “डॉक्टरांनाही न्याय हवा” अशी भावना सर्वत्र उमटताना दिसत आहे. डॉ . संपदा मुंडे प्रकरणी न्याय मिळावा म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर आज निदर्शने करत आहेत. मात्र यामुळे वैद्यकीय सेवेवर फारसा परिणाम झाला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार यांनी दिली.
