दहा किमीसाठी विमानाला दोन तास!

टॅक्सी-वेच्या मार्गात शिवणगावचा रस्ता

Plane
(प्रातिनिधीक फोटो)

टॅक्सी-वेच्या मार्गात शिवणगावचा रस्ता

नागपूर : विमानाने मुंबई ते नागपूरला येण्यासाठी जेवढा वेळ लागतो, त्याहून अधिक वेळ विमानाला नागपूर विमानतळाला लागून असलेल्या मिहानमधील एमआरओपर्यंत पोहचायला लागत आहे. याचे कारण विमानाला चालू अवस्थेत आणण्याची परवानगी नाही.

नागपूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि मिहानमध्ये एअर इंडिया आणि इंदमारचे देखभाल-दुरुस्ती केंद्र (एमआरओ) आहे. ठराविक कालावधीनंतर विमानाची देखभाल दुरुस्ती केली जाते. पण, नागपूर विमानतळ ते मिहानमधील एमआरओपर्यंतचे अंतर कापायला विमानाला बराच वेळ लागत आहे. हे अलीकडे जेटसेटगोने आर्यलडवरून भारतात आयात केलेल्या विमानाच्या आगमन प्रसंगी प्रकर्षांने जाणवले. जेटसेटगोने आठ आसन क्षमता असलेले चार्टड विमान नागपुरात उतरवले. ते एअर इंडियाच्या एमआरओपर्यंत आणण्यासाठी दोन तासांहून अधिक वेळ लागला. त्यासंदर्भात जेटसेटगोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कंपनीच्या सहसंस्थापक कनिका टेकरीवाल यांनी जेवढा वेळ आर्यलडहून भारतात येण्यासाठी लागला, तेवढा वेळ विमानतळावरुन एमआरओपर्यंत येण्यासाठी या विमानाला लागत आहे, असे बोलून दाखवले होते.

याबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, नागरी उड्डयण महासंचालक यांनी २०१४ जी मान्यता दिली. त्यानुसार टॅक्सी-वे द्वारे विमानाला ओढत (टोईंग) केले जाते. ही परवानगी  टॅक्सी-वेला छेदून जाणारा शिवणगाव रस्ता डोळ्यासमोर ठेवून दिली गेली होती. तेथे विमान चालू स्थितीत (पॉवर इन पॉवर आऊट) एमआरओपर्यंत आणण्याची परवानगी नाही.

मिहान प्रकल्पासाठी शिवणगावचे भूसंपादन केले जाणार आहे. या संपूर्ण गावाचे चिंचभवन येथे पुनर्वसन होणार आहे. त्यानंतर शिवणगाव विमानतळाचा भाग होणार आहे. या गावातील ५० टक्क्यांवर नागरिक स्थानांतरित झाले आहेत. या गावासाठी जयताळाकडून पर्यायी मार्ग आहे. पण, त्यांना वर्धा मार्गावर येण्यास टँक्सी-वे कडून सोयीचे पडते म्हणून हा रस्ता सुरू आहे. ज्यावेळी विमान आणले जाते, त्यावेळी दोन्ही बाजूला सुरक्षा रक्षक आणि पॅनल लावून रस्ता बंद केला जातो. ओढून आणण्यासाठी बराच वेळ लागतो. वेळ वाचवण्यासाठी विमान चालू अवस्थेत आणावे लागेल. त्यासाठी शिवणगाव स्थानांतरित होणे आवश्यक आहे. ही संपूर्ण जमीन विमानतळाच्या संचालनासाठी वापरात येईल. तेव्हाच ते शक्य आहे. त्यासाठी हा रस्ताही बंद करावा लागेल. पण, जोपर्यंत गावकरी सहमत होत नाहीत आणि गाव स्थानांतरित होत नाही, तोपर्यंत त्याला पर्याय नाही, असेही वरिष्ठ अधिकारी म्हणाले.

शिवणगावच्या पुनर्वसनासाठी पुरेसा निधी हवा

तत्कालीन फडणवीस सरकारने शिवणगाव येथील नागरिकांना चिंचभवन येथे घर बांधून होईस्तोवर घरभाडे देण्याचा निर्णय घेतला होता. त्यास गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. दोन वर्षांचे घरभाडे दिले जाणार होते. राज्य सरकारने भूसंपादन आणि पुनर्वसनासाठी पुरेसा निधी दिल्यास शिवणगावचा प्रश्न मार्गी लागेल, असे एमएडीसीच्या वरिष्ठ अधिकारी म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Plane take two hours for ten km zws

ताज्या बातम्या