नागपूर : मोकळा भूखंड विक्री करायचा असल्याची ओ.एल.एक्स. वर जाहिरात देणाऱ्यांना हेरून त्यांच्याकडील मूळ कागदपत्रे मिळवत भुखंडाची तिसऱ्याच्याच नावाने विक्री करत बँकांकडून मिळालेल्या कर्जाची वाटणी करून घेणाऱ्या टोळीचा भंडाफोड करत परिमंडळ ४ ने पाच जणांना अटक केली. या टोळीने बनावट नावाने भुखंडाची खरेदी करणारा आणि विक्रेता उभा करीत शहरातील अनेक बँकांना ३ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे टोळीचा मास्टरमाईंड आणि त्याच्या दोन साथीदारांवर यापूर्वीही फसवणूकीचे पाच गुन्हे दाखल आहेत. टोळीने आतापर्यंत ११ ठिकाणी बनावट खरेदीदार आणि विक्रेते उभे करत बँकांकडून ३ कोटीच्या रक्कम लाटली आहे. निलेश मनोहर पौनिकर, संदिप चांदराव निंभोरकर, इशान बळीराम वाटक, इमरान अली अख्तर अली हाशमी, अजय वामनराव पाठराबे अशी पोलिसांनी अटक केलेल्या भूखंड माफीया टोळीतल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

यापैकी निलेश पौनिकर टोळीचा मास्टरमाईंड आहे. तर साधिदार संदिप हा त्याला सावज शोधण्यासाठी मदत करतो. ईशान वाटकर बनावट खरेदीदार म्हणून उभा राहतो. इम्रान हा मूळ भूखंड मालकाच्या जागी बनावट कागदपत्रे तयार करून देतो. या पाच जणांनी याच पद्धतीने बनावट भूखंड विक्रेता आणि खरेदीदाराच्या नावाने ६ बँकांकडून ३ कोटीच्या कर्जाची रक्कम लाटली आहे.

सध्या पुणे येथे वास्तव्य करणारे वाठोडा येथील निरज सोईतकर यांनी अंबे नगरातील सदनीका विक्री करणार असल्याची जाहिरात ओ.एल.एक्सवर प्रकाशित केली होती. संपर्क साधण्यासाठी सोईतकर यांनी नातेवाईक धनंजय जैन यांचा क्रमांक दिला. त्या आधारे  टोळीचा मास्टरमाईंड पौनिकरने जैन यांच्याकडून मूळ कागदपत्रे मिळवली. त्याचा गैरवापर सदनिकेचे मूळ मालक सोईतकर यांच्या जागी बनावट विक्रेतेच्या नावाने कागदपत्रे तयार केली. सदनिकेच्या विक्रीसाठी त्यांनी पुन्हा बनावट खरेदीदार तयार केला आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ३० लाखांचे कर्ज लाटले.

अशी सापडली टोळी

बनावट ग्राहक आणि विक्रेता उभा करून बँकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा उलगडा झाल्यानंतर जैन यांनी १९ ऑगस्टला दिलेल्या तक्रारीच्या आधारावर वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याचा तपास करताना पोलिसांना पौनिकरचा सुगावा लागला. फेसबूकवरून त्याच्या मुलाचा फोटो काढून घेत पोलिसांनी गणवेशाच्या आधारावर पौनिकरला आधी बेड्या ठोकल्या. त्यानंतर टोळीतल्या अन्य सदस्यांना ताब्यात घेण्यात आले.

अशी आहे टोळीची मोडस ऑपरेंडी

मोकळे भूखंड आणि सदनिकेच्या विक्रीची जाहिरात ओ. एल. एक्स. वर प्रकाशित करणाऱ्या गरजूंचा ही टोळी माग काढते. त्यानंतर संबंधितांना फोन करून सदनिका अथवा भूखंड खरेदी करायचा असल्याचे सांगत त्यांच्याकडून नोंदणीची मूळ प्रत मिळवते. त्या आधारे मूळ मालकाचा फोटो वापरून बनावट रजिस्ट्री तयार केली जाते. बनावट कागदपत्रे तयार झाल्यानंतर बनावट खरेदीदार बँकेपुढे उभा करत कर्ज मंजूर करून ती रक्कम परस्पर वाटून घेतली जाते.

बनावट खरेदीदार उभा करत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेल्या हप्ते थकल्याने बँकेने घर गाठल्यानंतर या फसवणूकीचा उलगडा झाला. अशाच पद्धतीने या टोळीने शहरात ११ ठिकाणी बनावट खरेदीदार आणि विक्रेता उभा करत बँकांची ३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे आतापर्यंत केलेल्या तपासातून निष्पन्न झाले आहे. त्यांनी आणखी किती जणांची फसवणूक केली याचा शोध घेतला जात आहे.-रश्मिता राव, पोलीस उपायुक्त, परिमंडळ- ४