नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद (नोटबंदी) केल्या होत्या. त्यानंतर नागपूरसह देशभरातील बँकांपुढे नागरिकांच्या नोटा बदलण्यासाठी रांगा लागण्यासह इतरही अनेक धक्कादायक घडलेले दृष्य आजही डोळ्यापुढे उभे राहतात. या नोटाबंदीच्या निर्णयावर असोसिएशन ऑफ सोशल ॲन्ड आरटीआय ॲक्टिव्हिस्ट संघटनेकडून (आसरा) टिका केली गेली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये अचानक ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करून नोटबंदीचा निर्णय जाहिर केला. यावेळी देशातील काळापैशावर नियंत्रण, बनावट नोटा चलनातून बाद होणार, अतिरेक्यांची आर्थिक रसद बंद होऊन आतंकवादावर नियंत्रणाचा दावा झाला होता. परंतु प्रत्यक्षात या तिन्ही गोष्टी आताही सुरू असून केंद्र सरकारचा दावा फोल असल्याचा आरोप आसरा या संघटनेने केला आहे.
आसराचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संजय थुल म्हणाले, पंतप्रधानांनी नोटबंदी लागू करताच ९ नोव्हेंबरपासूनच नागपुरातील सर्व राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांबाहेर मोठमोठ्या रांगा लागल्या. लोक जुन्या नोटा बदलण्यासाठी व नवीन २००० आणि ५०० च्या नोटा मिळवण्यासाठी तासन्तास उभे राहत होते. नागपूरमधील स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक, अॅक्सिस बँक आदी शाखांमध्ये गर्दीचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यामुळे काही ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवावा लागला.
सुरुवातीच्या काही दिवसांत एटीएममध्ये रोकड उपलब्ध नसल्याने बहुतेक मशीन बंद पडली होती. काही दिवसांनी २००० च्या नोटा येऊ लागल्या, पण ५०० च्या नव्या नोटांचा तुटवडा होता. त्यामुळे छोट्या व्यवहारांसाठी लोकांना अडचणींना सामोरे जावे लागल्याचेही थुल यांनी सांगितले.
बाजारपेठेतील मंदी
नागपुरातील इतवारी, धरमपेठ, महाल, सीताबर्डी अशा व्यापारी भागात विविध वस्तूंच्या विक्रीत मोठी घट नोंदवली गेली. दागिन्यांच्या, इलेक्ट्रॉनिक्स, कपड्यांच्या दुकानांमध्ये ग्राहक नव्हते. अनेक व्यापाऱ्यांनी रोखीच्या ऐवजी डिजिटल पेमेंट्स सुरू केले. हा व्यवहार आज वाढला. परंतु आजही दावा केल्याप्रमाने डिजिटल व्यवहार होत नसल्याचाही आरोप थुल यांनी केला.
पेट्रोल पंपावर जुन्या नोटा घेऊन इंधन भरण्यासाठी रांगा…
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार काही दिवस जुन्या नोटा पेट्रोल पंपांवर, सरकारी रुग्णालयांत व औषधांच्या दुकानांत स्वीकारल्या जात होत्या. त्यामुळे शहरातील पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी येणारे ग्राहक जुन्याच नोटा घेऊन येत होते. या काळात पेट्रोल पंपाकडून बँकांत जमा होणाऱ्या जुन्या नोटांची संख्या बघता हे व्यवसायीकांनाही संशयाच्या नजरेने बघितले जात असल्याचे चित्र होते.
एटीएम केंद्र व बँक परिसरात पोलीस बंदोबस्त…
नोटबंदीनंतर नोटा बदलण्यासाठी एटीएम आणि बँक परिसरात गर्दी बघता अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून येथे गर्दी नियंत्रणासाठी बंदोबस्त वाढवला होता. काही ठिकाणी गर्दी अनियंत्रित झाल्याने पोलिसांना सौम्य बळाचा वापरही करावा लागला होता.
