नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागपुरात आगमन होताच त्यांचा वाहनाचा ताफा वर्धा मार्गावर अजणी चौकातून जात असताना राजीव गांधी पुतळ्याजवळ विदर्भ राज्य आंदोलन समितीने स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी काळे फलक पंतप्रधानांना दाखवले. पंतप्रधान त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी रेल्वे स्थानकावर जात होते.

पोलीस बंदोबस्त चोख होता. समितीने वेगळ्या विदर्भाच्या मागणीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना रस्त्याच्या दूरवर जाऊन फलक हाती घेऊन उभे राहण्याची परवानगी दिली. आंदोलकांनी ‘ मोदी साहाब विदर्भ की जनता का करो विचार, अब नही सहेंगे महाराष्ट्र सरकारका अत्याचार ’‘ रोजी रोटीअपना राज लेके रहेंगे विदर्भ राज ’ अशा घोषणा फलकावर लिहिल्या होत्या.आंदोलनासाठी आम्ही परवानगी घेतली असल्याचे समितीचे अध्यक्ष अरुण केदार यांनी सांगितले. पंतप्रधान यांनी विदर्भ राज्याची घोषणा करावी अशी मागणी यावेळी केली.या वेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतले.