नागपूर: वाठोडा पोलीस गस्त घालत असताना एक युवक पोलिसांना दिसला. पोलीस दिसताच त्या युवकाने गतीने चालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याला थांबण्यास सांगितले असता तो पळायला लागला. पोलिसांनी त्या युवकाचा पाठलाग करून पकडले. त्याला खाक्या दाखवताच त्याने घरफोडी केल्याचा गुन्हा कबूल केला. साहील उके (२०) रा. रामबाग असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तो घरफोडीचा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द वाठोडा, नंदनवन आणि इमामवाडा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे.

स्नेहल नगर, वाठोडा येथील रहिवासी फिर्यादी पुष्पा तुरकर (३५) या कुटुंबासह कोराडी येथे दर्शनाला गेल्या होत्या. ही संधी साधून आरोपीने घरात प्रवेश करीत रोख रक्कम आणि दागिने चोरले. दरम्यान फिर्यादी पहाटेच्या सुमारास कोराडीहून परतल्या असता त्यांना घरात लाईट सुरू दिसला. दाराचा कडी कोंडा तुटलेल्या स्थितीत होता. मागच्या दारातून घरात प्रवेश केला असता चोर पळून गेला. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

हेही वाचा… नागपूर: खाकीच्या बळावर गुंडगिरी, तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी; ठाणेदारासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

गुन्ह्याचा तपासासंबधी पोलीस पथक जिजामाता नगर मार्गाने जात असताना साहिल संशयास्पद आढळला. पोलिसांनी त्याला पकडून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तपासात त्याने वाठोड्यातील आणखी एक गुन्हा कबूल केला. त्याच्याकडून २ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रांत सगणे, अतूल भारसाकळे, सुनील वानखेडे, प्रफुल्ल वाघमारे, मंगेश टेंभरे आणि आशीष बांते यांनी कारवाई केली.