अकोला : सोलापूर येथील मोर्चात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी धार्मिक द्वेष पसरवणारे विधान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रदेश संघटक सचिव जावेद जकरिया यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

‘दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांनी खरेदी फक्त हिंदू लोकांच्या दुकानातून करावी. आपल्या दिवाळी खरेदीचा नफा केवळ हिंदू लोकांनाच मिळायला हवा. सध्या हिंदू मंदिरात अथवा हिंदूंवर होणारे हल्ले हे मशिदीमधून घडत आहेत,’ असे विधान आ. संग्राम जगताप यांनी केले होते. हे विधान धार्मिक द्वेष, भेदभाव आणि आर्थिक बहिष्काराला प्रोत्साहन देणारे असल्याचे राष्ट्रवादीने दिलेल्या पोलीस तक्रारीत नमूद केले आहे. या विधानाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम १९६, १९८ आणि ३५३ (२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची मागणी तक्रारीत केली. समाजात एकता आणि सौहार्द टिकवणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असते. धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या विधानांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जावेद जकारिया यांनी केली.

या तक्रारीची पोलिसांनी नोंद केली असून आवश्यक ती पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी दिले. यावेळी राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष रफिक सिद्दिकी, प्रदेश संघटन सचिव जावेद जकरिया, कार्याध्यक्ष देवानंद टाले, सै.युसूफ अली, पश्चिम विधानसभा अध्यक्ष मेहमूद खान पठाण, महबूब मंतुवाले, पापाचंद पवार, ॲड. संदीप तायडे, बाबासाहेब घुमरे, शौकत अली, मोहम्मद शाफिक , रजिक इंजिनियर खान, अल्ताफ खान, उमेश खंडारे, नरेंद्र देशमुख, शाहीद सिद्दिकी, वसीम खान, रमेश नाईक, भाऊराव साबळे, अमन घरडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप यांच्या विधानावरून वाद

दिवाळी सणामध्ये हिंदुंच्या दुकानातूनच करा. आपल्या सणाचा नफा आपल्या लोकांनाच मिळायला हवा, असे विधान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. अजित पवार यांनी देखील या विधानावर नाराजी व्यक्त करून कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे स्पष्ट केले.