अकोला : दिवसा मजुरी आणि रात्री गुन्हेगारी करणाऱ्या दोन जणांच्या टोळीचा शहरातील खदान पोलिसांनी उलगडा केला आहे. पोलिसांनी दोन अट्टल चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी तब्बल ११ ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. या आरोपींकडून पोलिसांनी १४.३२ लाखाचा मुद्दे माल जप्त केला आहे.
शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. घर मालक बाहेर गावी गेल्यावर बंद घरांना लक्ष्य करून दागिण्यांसह रोख रक्कम लंपास करण्याचे सत्रच चोरट्यांनी सुरू केले होते. आरोपींना गजाआड करण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. दरम्यान, २४ जून रोजी यज्ञेश मोहन जोशी, रा. केशव नगर यांनी खदान पोलीस ठाण्यात घरी चोरी झाल्याची तक्रार दिली.
ते काही कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. परत आल्यावर घर विस्कळीत झाल्याचे दिसून आले. त्यांनी पाहणी केल्यावर घरातून ४७ हजार २०० रुपये चोरी गेल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी खदान पोलिसांनी कलम ३११ (४), ३०५ बी.एन.एस अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या प्रकरणाच्या तपासादरम्यान गुप्त माहितीवरून आरोपी शेख अहमद शेख उर्फ आरीफ (४६ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा.भगतवाडी, डाबकी रोड, अकोला), तेजस कैलास खोब्रागडे (वय ३२ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा.जुना तारफाईल, अकोला) यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली. या आरोपींनी खदान पोलीस ठाण्यांतर्गत घरफोडीचे एकूण ११ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
गुन्ह्याच्या तपासात आरोपींच्या ताब्यातून ११३ ग्रॅम सोने किंमत १० लाख १७ हजार, चांदी २. ९१० किलो किंमत दोन लाख ६१ हजार गुन्हयात वापरलेल्या दोन दुचाकी एक लाख ५० हजार व इतर साहित्य ५०० रुपये असा एकूण १४ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे, पो.हे.कॉ. अमित दुबे, पो.हे.कॉ. निलेश खंडारे, पो.कॉ. अभिमन्यु सदांशिव, वैभव कस्तुरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. या चोरट्यांनी आणखी कुठे गुन्हे केले आहेत का? या दृष्टीने पोलीस पुढील तपास करीत आहेत.