नागपूर: बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकांना मान्यता देणे, मान्य ठरावामध्ये फेरबदल करून खोटे नियुक्तीपत्र दिणे, खोटे रुजू अहवाल आणि खोट्या व बनावट नियुक्त्या, पदोन्नती दाखवून शासनाची दिशाभूल केल्याच्या आरोपाखाली नागपूर विभागीय माजी उपसंचालक वैशाली जामदार यांची चौकशी होणार आहे. सदर पोलिसांनी त्यांना तशी नोटीस दिली असून बुधवारी सकाळी सदर पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

वैशाली जामदार सध्या छत्रपती संभाजीनगर येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात सचिव आहेत. नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर अशा जिल्ह्यांमध्येही बनावट कादपत्रांच्या आधारे शिक्षक, मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्याची माहिती आहे. भंडारा जिल्ह्यातील वरठी येथे दोन शिक्षकांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नियुक्ती झाल्याने माजी उपसंचालक वैशाली जामदार यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली.

अटकेत असलेल्या सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील लोकमान्य विद्यालयातील ११ कर्मचाऱ्यांच्या नियमबाह्य नियुक्तीचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. शाळा व्यवस्थापनाने संस्थेच्या दोन शाळांमध्ये पाच शिपाई व सहा लिपिक वर्गाच्या पदांची भरती केली.

या भरतीला चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी पूनम मस्के यांनी मान्यता दिली होती. त्यानंतर आलेल्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी २०२२ मध्ये या भरतीमध्ये घोळ असल्याचा ठपका ठेवत कर्मचाऱ्यांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला व प्रकरण पुढच्या निर्णयासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठवले.

तत्कालीन शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांच्या काळात कर्मचाऱ्यांचा शालार्थ मंजूर करण्यात आला होता, असाही आरोप आहे. त्याच्या चौकशीसाठी जामदार यांना पोलिसांनी नोटीस दिली असून बुधवारी त्यांची चौकशी होणार आहे.