नागपुरातील कापड व्यापारी आणि बुलढाण्याच्या कांदा व्यापाऱ्यामध्ये ३० लाखांची उसनवारी झाली. मात्र, बुलढाण्याच्या व्यापाऱ्याने कोलकतामधील ठोक व्यापारी हाजी साहब यांना ३० लाखांच्या बनावट नोटा देऊन फसणूक केल्याचा गुन्हा तहसील पोलिसांनी दाखल केला. मात्र, हे प्रकरण उसनवारीचे नसून हवाला व्यापाराचे असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे तहसील पोलिसांच्या गुन्हा दाखल करण्यावरच संशय निर्माण झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून धान्य व्यापाऱ्यांपासून ते सराफा व्यापाऱ्यांपर्यंत लूटमार करण्याचे काम तहसील पोलीस आणि उपायुक्तांच्या विशेष पथकाकडून सुरू असल्याची पोलीस दलात चर्चा होती. त्यातच तहसील पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एका सराफा व्यापाऱ्याला १४ लाखांनी लुबाडल्याचेही समोर आले होते. आता तहसीलमधील कापड व्यापारी ऋषी मोदी आणि खामगावमधील आरोपी कांदा व्यापारी गिरीष राठी यांच्यात झालेल्या ३० लाखांच्या व्यवहारात बनावट नोटांचे प्रकरण समोर आले.

हेही वाचा: ‘डायल ११२…’ तक्रार किंवा माहिती देणे ठरतेय अडचणीचे

२१ सप्टेंबर २०२२ रोजी राठी याने ऋषी मोदीकडून ३० लाख रुपये उसनवारी म्हणून घेतले. काही दिवसानंतर त्याला पैसे परत मागितले असता राठी याने बनावट ३० लाखांच्या नोटा कोलकाचा व्यापारी हाजी साहब याला देऊन फसवणूक केली. याप्रकरणी तहसील पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मात्र, फसवणूक जर कोलकत्याच्या व्यापाऱ्याची झाली असेल तर तहसील पोलिसांनी कोणत्या आधारावर गुन्हा दाखल केला? याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा: Maharashtra News Live : आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन; सीमाप्रश्नांसह विविध मुद्द्यांवरून अधिवेशन गाजणार? जाणून घ्या प्रत्येक अपडेट

गुन्हे शाखा करणार तपास

कोलकता, बुलढाणा आणि नागपुरातील व्यापाऱ्यांमध्ये झालेला व्यवहाराला हवाला व्यापाराची किनार आहे. त्यामुळे तहसील पोलिसांकडून तपास काढून गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक महेश सांगडे यांच्याकडे तो दिला आहे. या प्रकरणात बनावट नोटांचा व्यवहार करण्यात आला असून हवाला व्यापाराचा संशय आहे. तहसील पोलिसांनी ‘अर्थपूर्ण’ संबंध ठेवून गुन्हा दाखल केल्याची चर्चा पोलीस दलात आहे. या सर्व बाबींवर लक्ष देऊन तपास केल्या जाणार असल्याची प्रतिक्रिया सांगडे यांनी दिली.