लोकसत्ता टीम

यवतमाळ: दारव्हा तालुक्यातून ‘एमडी’ नावाच्या अंमली पदार्थाची तस्करी होत असल्याची टीप मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत तिघांना अटक केली. या कारवाईत १४१ ग्रॅम एमडी अंमली पदार्थासह १६ लाख ४७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई आज, गुरूवारी दारव्हा तालुक्यातील मानकोपरा येथे करण्यात आली.

एका चारचाकी वाहनातून एमडी अंमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेस मिळाली. त्यावरून पोलिसांनी दारव्हा तालुक्यातील मानकोपरा येथे सापळा रचला. खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या वर्णनातील वाहन (क्र. एमएच ४९, बी- ७०८२) येताच पोलिसांनी ते थांबवून त्याची झडती घेतली. तेव्हा डॅशबोर्डवरील डिक्कीत एका पाऊचमध्ये पांढऱ्या रंगाचे पावडर सापडले. ही पावडर एमडी नावाचा अंमली पदार्थ असल्याची खात्री पटताच पोलिसांनी वाहनातून प्रवास करणारे आरोपी युनूस खान अमीर खान पोसवाल (३६, लोहारा लाईन पांढरकवडा), वसीम उर्फ राजा खान अक्रम खान (३४, पठाण चौक, अमरावती) आणि सय्यद इर्शाद उर्फ पिंटू सय्यद गौस (३५, बेगम बाजार, अमरावती) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १४१.६ ग्रॅम वजनाचे ११ लाख ३२ हजार ८०० रूपये बाजारमूल्य असलेले एमडी अंमली पदार्थ, चारचाकी वाहन व तीन मोबाईल असा एकूण १६ लाख ४७ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा… बुलढाणा : महाविकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व; चिखली, देऊळगाव राजा बाजार समित्यांमध्ये सभापती, उपसभापती अविरोध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी व त्यांच्या पथकाने केली. अलिकडच्या काळातील एमडी अंमली पदार्थ जप्त करण्याची ही मोठी कारवाई आहे.