नागपूर: राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने पोलिसांना दमदाटी करणाऱ्या तीन जणांवर अखेर जुनी कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकाराची गंभीर दखल घेत स्वतः पालकमंत्री बावनकुळे यांनी आरोपींवर कठोर कारवाईचे आदेश देत रीतसर तशी लेखी तक्रारही दाखल केली. मैत्री दिनानिमित्त रविवारी ३ ऑगस्टला जिल्ह्यातील जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल ईडन ग्रीन्स येथे हा प्रकार घडला होता.

हॉटेल ईडन ग्रीन्स येथे रविवारी ‘फ्रेंड्स अँड बियाँड’ हा कार्यक्रम झाला. येथे पोलिसांनी परवानगी देताना आखुन दिलेल्या अटी व शर्थीचे पालन होत नव्हते. दरम्यान दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या वादाची माहिती मिळताच जुनी कामठी ठाण्याचे पोलीस पथक कार्यक्रमस्थळी पोचले. त्यावेळी आरोपी वेदांत छाबरिया, रितेश चंद्रशेखर भदाडे, आकाश बनमाली यांनी पोलिसांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने दमदाटी केली. पोलिसांनी गर्दी शांत करण्यासाठी संगीत बंद करून पार्टी थांबवली.

या मुळे उद्भवला वाद

वादाला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली, ती पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर. पोलीसांनी ठरवून दिलेल्या अटी वर शर्थीचे उल्लंघन होत असल्याने पार्टी आयोजकांना मज्जाव केला असता वेदांत छाबरिया हा पोलिसांना धमकावत होता. गरज पडल्यास मी थेट महसूल मंत्री बावनकुळे यांच्याशी बोलेन असे तो म्हणाला. त्यावर पोलिस अधिकारी आयोजकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्यास सांगत असतानाही तो मोठ्या आवाजात पोलिसांना धमकावत होता. याची चित्रफित समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण थेट पालकमंत्री बानवकुळे यांच्यापर्यंत पोचले. त्यांनी याची गंभीर दखल घेत लगेच पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्याशी संपर्क साधला. सबंधितांवर कठोर कारवाईचे आदेशही त्यांनी दिले.

पोलीस काय म्हणाले

झालेल्या प्रकाराबाबत संपर्क साधला असला पोलीसांची भूमिका मांडताना परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त निकेतन कदम म्हणाले, झालेल्या प्रकाराची चित्रफित मी स्वतः पाहिली आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आयोजकांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे.