अकोला : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजप व काँग्रेसमध्ये ‘शाब्दिक वॉर’ सुरू झाल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. हरियाणातील मेवावत पॅटर्न काँग्रेसकडून अकोल्यात राबविण्यात येत असल्याचा गंभीर आरोप मध्य प्रदेशातील भाजपचे आमदार राजकुमार मेवा यांनी केला. भाजपच्या आरोपांना काँग्रेसचे प्रदेश महासचित प्रकाश तायडे यांनी प्रत्युत्तर दिले. भ्रष्टाचार, महापालिकेतील करवाढ, अकोलेकरांची लूट आदी मुद्दे प्रचारातून दुर्लक्षित करण्यासाठीच भाजपकडून बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचा पलटवार प्रकाश तायडे यांनी केला.

अकोला पश्चिम मतदारसंघातील प्रचार मोहिमेत एकमेकांवर जोरदार चिखलफेक सुरू झाली आहे. या मतदारसंघात भाजपचे विजय अग्रवाल, काँग्रेसचे साजिद खान पठाण व वंचित समर्थित अपक्ष उमेदवार हरीश आलिमचंदानी यांच्यात काट्याची लढत होत आहे. प्रचाराचा धुरळा जोरदार उडत आहे. यामध्ये जातीय तणाव, गुन्हेगारी प्रवृत्ती, महापालिकेतील भ्रष्टाचार, करवाढीमुळे अकोलेकरांची लूट आदी स्थानिक मुद्दे केंद्रस्थानी आले आहेत. हरियाणातील मेवावत येथे दंगेखोराने काँग्रेसची उमेदवारी घेऊन त्या भागात दहशत निर्माण केली. तोच प्रकार काँग्रेसकडून अकोल्यात राबविण्यात येत असून हरियाणा पॅटर्न येथे लागू केला जात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे मध्य प्रदेशमधील आमदार राजकुमार मेवा यांनी केला. काँग्रेस उमेदवार साजिद खान पठाण यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप लावले आहेत.

हेही वाचा…VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपच्या या आरोपांना आता काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रकाश तायडे यांनी भाजपचा खरपूस शब्दात समाचार घेतला. अकोला महापालिकेत भाजपची सत्ता होती. या सत्ता काळात भाजपने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. दर्जाहीन कामे केली. अवाढव्य करवाढ लादल्याने नागरिकांमध्ये रोषाची भावना आहे. त्यामध्ये भाजप उमेदवार विजय अग्रवाल यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी अकोलेकरांची लूट चालवली आहे. आपल्या या पापांवर पांघरूण टाकण्यासाठीच भाजपकडून काँग्रेस उमेदवार साजिद खान पठाण यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत, अशी टीका प्रकाश तायडे यांनी केली. प्रचारामध्ये विकासाच्या मुद्द्यांऐवजी दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. भाजप, काँग्रेस व वंचित समर्थित अपक्ष उमेदवारांनी गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत प्रतिनिधित्व केले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अकोला महापालिकेतील मुद्दे प्रकाश झोतात आले आहेत.